सध्या तरी मी काँग्रेसमध्ये पण काँग्रेसवाले मला आपला मानतात का ?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीवेळी भाजप आमदारांसोबत बैठका झाल्या. निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही भेट घेतली. या भेटींमध्ये कुठेही पक्ष प्रवेशाचा विषय निघाला नाही. सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे. पण काँग्रेसवाले मला आपला मानतात का, असा सवाल माने यांनी केला समोरच्या पॅनलमध्ये भाजपसोबत काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, महादेव चाकोते अशा विविध पक्षातील नेत्यांचा समावेश होता. माने म्हणाले, आमच्या पॅनलची चर्चा आहे. ते पराभूत म्हणून त्यांची चर्चा नाही. निवडणुकीवेळी मला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी विचारले नाही. निवडून आल्यावर आणि सभापती झाल्यावरही अभिनंदन केले नाही, असा टोला माने यांनी लगावला. ज्यांच्या मागे २५-५० मते नाहीत त्यांनी मोठ्या अपेक्षा ठेवू नये. त्यांना त्यांच्या गावात सूचक -अनुमोदक मिळत नाही. या लोकांना संचालक व्हायचे आहे. पुढे जाऊन सभापती, उपसभापती व्हायचे असते. मागच्या टर्मला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले म्हणून मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ज्यांना सभापती व्हायचे आहे त्यांनीच १८ संचालकांना सांभाळणे आवश्यक होते. पण सर्वकाही मीच करून द्यावे, अशी त्यांची अपेक्षा होती. माने म्हणाले, या सर्व राजकीय घडामोडी पाहताना तुम्ही विधानसभा निवडणुकीत काय घडले ते आठवा. आता यांना वाटले असेल दिलीप माने पुन्हा निवडून येत नाही. पण मला माझे अस्तित्व दाखवायचे होते. लोक माझ्या मागे आहेत हा संदेश आता राज्यभरात गेला आहे. दिलीप मानेला असेच कुणी संपवू शकत नाही. कारण माझ्या मागे माझे लोक आहेत. माने म्हणाले, स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या मंत्रिपदाच्या काळात मी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे एकत्र होतो. निवडणूक झाल्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. निवडणुकीपूर्वी सर्वजण मिळून काम केले. आता सभापती निवडसुद्धा एकत्र येऊन करा. बाजार समितीसाठी मदत करतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
0 Comments