अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राबवणार
१०० दिवसांचा कार्यक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र शासनाने १०० दिवसाचा कृती आराखडा आखून पेंडिंग कामे पूर्ण केली आहेत. तद्नंतर आता शासनाने १५० दिवसाचा आराखडा राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्याच धर्तीवर कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती करण्याकरिता १०० दिवसाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्याची सुरुवात पंढरपूरमधून आज करणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, राज्यभरामध्ये एक लाख ३७ हजार तरुण उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. याकरिता ११७८२ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले असून या कर्जाच्या व्याजापोटी १०९० रुपये व्याज परतावा देण्यात आला आहे. आजपर्यंत १३४५० मराठा उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ही आकडेवारी आणखीन वाढावी, मराठा समाजातील युवक उद्योगाकडे वळावा याकरिता आपण शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करून राज्यभर याचा प्रचार आणि प्रसार करणार असून प्रकरण करण्याबाबत बँकांच्या अडचणीही समजून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत अनंत जाधव, योगेश वाघ व मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
बँकांनी १२ टक्केपेक्षा जास्त व्याजदर आकारू नये कर्ज मर्यादा होणार पंधराहून २५ लाखापर्यंत
केवायसीकरिता आकारले जातात दहा दहा हजार रुपये
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एखाद्या तरुण उद्योजकाला जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याविषयी लागणारी कागदपत्रे तयार करण्याकरता एजंटाची मोठी फौज निर्माण होत आहे. तर महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत देण्यात येणाऱ्या केवायसीकरिता दहा हजार रुपये लुटण्याचा प्रकार महा-ई-सेवा केंद्राचे चालक करत आहेत, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.
जिल्ह्यात दक्षिण उत्तर, अक्कलकोटची टक्केवारी कमी
सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्ज घेण्यामध्ये उत्तर तालुका एकदम मागे आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत फक्त १९४ लाभार्थी आहेत. तर अक्कलकोटमध्ये १२१ लाभार्थी आहेत. तरी या तीन तालुक्यातील लाभार्थ्यांनी महामंडळाबाबतची माहिती घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा
सोलापूर जिल्ह्यात लोकमंगल बँक, शरद नागरी सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा फायनान्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून मराठा उद्योजकांना कर्ज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे चित्र चांगले आहे.
नागपूर महोत्सवात मागणी केली आहे
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाकरिता एका लाभार्थ्याला पंधरा लाख रुपयेपर्यंत कर्ज देण्याची परवानगी आहे. पूर्वी दहा लाख होते, नंतर पंधरा लाख केले. आता नागपूर अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर आम्ही २५ लाखांची मागणी केली आहे, काही दिवसात ही मागणी मान्य केली जाईल.
बँकांनी ज्यादा व्याजदर आकारू नये
मराठा तरुणांना कर्ज पुरवठा करत असताना बँका ज्यादा कर्ज व्याज आकारतात. अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत. महामंडळ १२ टक्केने व्याज परतावा लाभार्थ्यांना देते, तेवढेच १२ टक्के व्याज बँकांनी घ्यावे. १४, १६, १८ टक्केपर्यंत व्याजदर लावू नये, असेही पाटील म्हणाले
0 Comments