किती दिवस शांत राहायचे, गुंडांचा माज उतरवणारच !
मनोज जरांगे पाटील संतापले
बीड (कटूसत्य वृत्त):-सत्तेच्या जोरावर गुंडांनी आमच्या पोरांवर हल्ले करायचे आणि आम्ही नुसत्या भेटी देत राहायचे का? बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना वारंवार घडत असताना सरकारकडून काहीच केले जात नाही. मग आम्ही तरी शांत किती दिवस राहायचे. गुंडाचा माज उतरावाच लागेल, त्यासाठी मी पुढाकार घेणार. यापुढे बोलणार कमी करणार जास्त अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी गर्भीत इशारा दिला.
शिवराज दिवटे मारहाणीत गंभीर जखमी झालेला असताना रुग्णालय प्रशासन मात्र त्याला फक्त मुक्का मार लागल्याचे सांगत आहे. त्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करू नये, ते चौकशीच्या फेऱ्यात अडकतील. तुमच्यावर कोणाचा दबाव असेल तर सांगा, घाबरू नका, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. शिवराज दिवटे याच्यावर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी दिवटे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
शिवराजला झालेल्या बेदम मारहाणीमुळे उमटलेले वळ पाहून अंगावर अक्षरश: काटा आला. सामूहिक कटातून त्याला वे मारण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. त्यासाठीच त्याचे अपहरण केले होते, पण लोक मदतीला धावून आल्यानेच शिवराज वाचला. वारंवार अशा घटना घडूनही सरकार काहीच करत नाही, आता आम्ही तरी किती दिवस शांत राहायचे. या गुंडांचा माज उतरावाच लागणार आहे. यापुढे मी बोलणार कमी आणि काम जास्त करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
शुक्रवारी शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली. दिवटे याला मारहाण करताना आरोपी याचा संतोष देशमुख पार्ट टू करू, असे म्हणत होते. गंभीर जखमी असलेल्या शिवराज दिवटे याची भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृतीची चौकशी केली. भेदरलेल्या दिवटे याला तोंडावरून हात फिरवत जरांगे यांनी धीर दिला. त्याच्या जखमा आणि अंगावर उमटलेले वळ पाहून जरांगे पाटील चांगलेच संतापले.
गुंडांचा माज उतरवण्यासाठी आता मीच पुढाकार घेणार असे स्पष्ट करतानाच बीड जिल्ह्यातील सर्व राजकीय घराणे व सामाजिक क्षेत्रातील लोकांशी चर्चा करून पुढचे पाऊल उचलणार असल्याचे जरांगे यांनी सांगीतले. बीड जिल्ह्यातील गुंडगिरी काही केल्या कमी होत नाहीये. असे हल्ले होणारच असतील तर आम्ही काय नुसत्या भेटी देत फिरायचं का? असा सवाल करत पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही, अशी टीकाही केली.
0 Comments