सोलापूर(कटूसत्य वृत्त):- शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत ऑगस्ट २०२५ सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. प्रवेशाची सविस्तर माहिती संकेतस्थळावर आहे. ही प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून (दि. १५) सुरू झाली.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन प्रत्येक शासकीय व खासगी संस्थेत निःशुल्क केले जात आहे. प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत शंका असल्यास संस्थेशी किंवा प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क करावा. प्रत्येक संस्थेत प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा आहे. एका मोबाईल क्रमांकावर एकच प्रवेश अर्ज नोंदवता येतो. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मोबाईल नंबर बदलू नये. प्रवेश अर्ज शुल्कही ऑनलाईनच भरायचे आहे. राखीवसाठी १०० रुपये तर खुल्या गटासाठी १५० रुपये शुल्क आहे.
उमेदवाराने प्रवेश अर्ज मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीचा एक संच संस्थेत पडताळणीसाठी सादर करावा.
एका उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त भरल्यास ते रद्द होतील. प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्राची प्रिंट घेऊन निवड झालेल्या संस्थेत प्रवेशासाठी वेळापत्रकानुसार हजर राहावे.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत २५० संस्थेतील २० टक्के जागा या माहिती पुस्तिकेत दिल्या आहेत. विशेष प्रशिक्षण शुल्क आकारून गुणवत्तेनुसार त्या जागा भरण्यात येतात. त्यासाठी इच्छुकांना प्रवेश प्रक्रियेत स्वतंत्र विकल्प देण्याची मुभा आहे.
0 Comments