Hot Posts

6/recent/ticker-posts

 सर्व विभाग व तालुका प्रमुख यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उडान उपक्रम यशस्वी करावा- जिल्हाधिकारी आशीर्वाद




सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- उडान 2025 अंतर्गत प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) कॉलिंग सेंटर द्वारे जिल्ह्यातील नागरिकांना फोन करून त्यांच्याकडून शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांच्या विभागाकडे तक्रारी असतील तर त्याच्या डॅशबोर्डवर नोंदी घेतल्या जात आहे व त्या नोंदीच्या आधारे संबंधित तालुकाप्रमुख व विभाग प्रमुख त्यांच्या तक्रारीचे निवारण आठ दिवसात करतील. यातून संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजना व प्रशासकीय कामकाजचा लाभ गतिमान पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे. तरी सर्व संबंधित विभाग प्रमुख व तालुकाप्रमुख यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

      जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित उड्डाण 2025 अंतर्गत प्रशासनात AI वापर उद्घाटन तसेच प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता अभियंता नरेंद्र खराडे, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांच्या सह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की प्राथमिक स्तरावर पुरवठा विभाग शिक्षण आरोग्य महिला व बालविकास व पशुसंवर्धन या पाच विभागाचा समावेश करण्यात आला असून या पाच विभागाच्या अनुषंगाने कॉलिंग सेंटर मार्फत दररोज 15 ते 20 हजार नागरिकांना मोबाईलवर फोन केले जात असून त्यातील सहा ते सात हजार कॉल वर नागरिक विचारलेला प्रश्नाचे उत्तरे देऊन संबंधित विभागाशी आपले मत मांडत आहे. त्यानुसार डॅशबोर्डवर माहिती तयार होत असून कोणत्या विभागाशी जास्त तक्रारी आहेत तसेच कोणत्या ठिकाणी काय करणे आवश्यक आहे याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होत असून त्यावर पुढील उपाययोजना करून शासकीय योजनांचा लाभ तसेच प्रशासकीय कामकाज अत्यंत गतिमान व सुलभ पद्धतीने करण्यासाठी याचा वापर करण्यास सुरुवात झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.

     जिल्ह्यात पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बाल विकास विभाग या विभागांचे लाभार्थी अधिक असल्याने AI कॉलिंग सेंटर साठी त्यांचा प्राधान्याने विचार केलेला असून त्यानंतर सर्व शासकीय विभागात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ए आय कॉलिंग सेंटर द्वारे कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे किंवा लाभार्थ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे त्यांनी केलेल्या माहितीचा डेटा संकलित करून संबंधित तालुका प्रमुख अथवा विभाग प्रमुख पहिल्या आठवड्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करतील तर प्रत्येक महिन्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी स्वतः तक्रारीच्या अनुषंगाने आढावा घेऊन त्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

      ज्या ठिकाणच्या तक्रारी कमी असतील त्या ठिकाणी एआय कॉलिंग सेंटर द्वारे कॉल चे प्रमाण कमी करण्यात येऊन ज्या ठिकाणी जास्त तक्रारी येत आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॉल करून डेटा संकलन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभाग प्रमुख तसेच तालुका कार्यालय प्रमुख यांनी उडान 2025 अंतर्गतचे AI कॉलिंग सेंटर चे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे. येणाऱ्या अडचणी याच ठिकाणी विचारून त्याचे निराकरण करून घ्यावे जेणेकरून प्रत्यक्ष वापर करताना नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यात त्याचा लाभ होईल. हा उपक्रम नाविन्यपूर्ण असून पुढील एक दोन महिन्यात व्यवस्थितपणे हा उपक्रम प्रत्येकाला समजेल व त्याचे चांगले परिणाम ही दिसून येतील असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

      महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. तसेच प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा सोलापूर हा देशातील पहिला जिल्हा असेल असेही त्यांनी सांगितले.

        प्रारंभी महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते उडान 2025 या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सर्व उपस्थित यांचे आभार मानले.

*लाभार्थी:- जिल्ह्यात 3250 शासनमान्य स्वस्त धान्य दुकाने आहेत. या अंतर्गत 16 लाख 50 हजार लोक प्रत्येक महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू घेतात. या सर्व यंत्रणेवर नियंत्रण असणे आवश्यक आहे त्यामुळे ए आय कॉलिंग सेंटरच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच शिक्षण विभाग अंतर्गत अडीच ते तीन हजार शाळा व दहा ते बारा हजार शिक्षक तसेच लाखो विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे आरोग्य विभागाकडे लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामुळे या विभागाच्या योजना कार्यपद्धती व नागरिकांना या योजनांचा लाभ मिळतो की नाही या अनुषंगाने या उपक्रमा अंतर्गत नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

*प्रशिक्षण:-

     मार्केटिक्स कंपनीचे संचालक मोहित कोकीळ यांनी उडान 2025 या उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय कॉलिंग सेंटर च्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागाच्या  जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण दिले.  यामध्ये या द्वारे कशा पद्धतीने कॉल केले जातात, या इकडे जिल्ह्यातील किती लाभार्थ्यांचे संपर्क क्रमांक आहेत, लाभार्थ्यांना कॉल केल्यानंतर ए आयमार्फत कशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला जातो, त्यानंतर संबंधित लाभार्थ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते, लाभार्थ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डॅशबोर्डवर मराठी व इंग्रजी मध्ये नोंदी घेतल्या जातात. प्रत्येक तालुका कार्यालय व जिल्हा कार्यालयांना लॉगिन आयडी उपलब्ध करून दिला जातो तो ओपन केल्यानंतर संबंधित विभागाच्या सकारात्मक तसेच नकारात्मक बाबी डॅशबोर्डवर संबंधितांना दिसतात व त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर कोकीळ यांनी उपाय सांगितले.

**


Reactions

Post a Comment

0 Comments