Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते

 महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते



मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस परेड ग्राउंड, पोलीस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक यांनी या ध्वजारोहण कार्यक्रमास सकाळी 7.30 वाजण्यापूर्वी पोलीस परेड ग्राउंड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

***

जिल्ह्यात पाच कृषी पर्यटन केंद्रासाठी 5 मे ते 15 मे 2025 दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा प्रशासन व प्रकल्प संचालक (आत्मा), सोलापूर कार्यालयाच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत, जिल्ह्यातील स्थानिक संस्थांच्या (विशेषत: शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट, उत्पादक गट इत्यादी) माध्यमातून एकूण 5 पथदर्शी कृषी पर्यटन केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित आहे.  हे प्रस्तावित कृषी पर्यटन केंद्रे पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी आणि करमाळा या ४ प्रमुख मंदिरांच्या परिसरात प्रत्येकी एक केंद्र, तसेच उजनी धरणाच्या जलाशयालगत च्या गावात एक केंद्र उभारणे अभिप्रेत आहे. ही केंद्रे संबंधित मंदिराच्या सुमारे 10 कि.मी. त्रिज्येतील मुख्य रस्त्यालगत किंवा जवळच्या ठिकाणी असावीत. उजनीच्या बाबतीत जलाशयालगतच्या गावांमध्ये स्थळ असावे.

            सी.एल.एफ., सी.एम.आर.सी. यांचा समावेश आहे. प्राप्त अर्जांवर जिल्हास्तरीय तांत्रिक समितीमार्फत ठरवलेल्या निकषानुसार निवड केली जाईल.

अर्ज प्रक्रिया व सविस्तर माहिती :- अर्ज व इतर अनुषांगिक माहिती प्रकल्प संचालक (आत्मा), कार्यालय नवीन आरटीओ ऑफिसच्या मागे, विजापूर रोड, सोलापूर येथे उपलब्ध असणार आहे. अर्जाचे शुल्क 100 रूपये असून श्री. फुटाणे विक्रम (एटिएम) मो. 9423232569 यांच्या कडून प्राप्त करून घ्यावा. अर्ज वाटपाचा कालावधी दिेनांक 5 मे 2025 ते 15 मे 2025 असेल. विहित नमुन्यास परिपूर्ण अर्ज प्रकल्प संचालक (आत्मा), कार्यालयात सादर करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल, विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, अशी माहिती प्रकल्प संचालक, आत्मा, सोलापूर यांनी दिली आहे.

00000


 

महाबीज च्या 49 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न....


 सेालापूर(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला अर्थात महाबीजचा 49 वर्धापन दिन तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांचे अध्यक्षतेखाली महाबीज मुख्यालय येथे उत्साहाने संपन्न झाले.

      या प्रसंगी अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, डॉ. पी.डी.के.व्ही, महाबीजचे संचालक वल्लभरावजी देशमुख व डॉ. रणजीतजी सपकाळ, संचालक बीज प्रमाणीकरण यंत्रणा अंकूशराव माने, यांची उपस्थिती होती.

       कार्यक्रमांची सुरुवात महाबीज मुख्यालय येथे वृक्षारोपण करुन करण्यात आली. या निमित्ताने मागील दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेले बीजोप्तादक, शेतकरी, महाबीज विक्रेते, महाबीज अधिकारी कर्मचारी यांना महाबीज गौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाव्यवस्थापक गु.नि.व संशोधन डॉ. प्रफुल्ल लहाने, यांनी महाबीजचा 49 वर्षातील प्रवासामध्ये महाबीज कर्मचाऱ्यांच्या तिन पिढ्यांचा संगम व भविष्याची वाटचाल याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच महाबीज संचालक डॉ. रणजीत सपकाळ यांनी महाबीजने सोयाबीन पिकाला पर्याय उपलब्ध करावा तसेच संत्रा व इतर फळपिकांचे संशोधनाकडे लक्ष केन्द्रीत करुन नविन वाण विकसीत करण्याकडे भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर ज्येष्ठ संचालक वल्लभरावजी देशमुख यांनी महाबीजचा पूर्वइतिहास सांगून महाबीजने चिया सिड्स, हळद व राजमा या पिकांचे वाण उपलब्ध करण्याचे कार्य सुरु असून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

         संचालक बिज प्रमाणीकरण यंत्रणा डॉ. अंकूशराव माने यांनी बिज प्रमाणीकरणामध्ये महाबीज अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळत असलेले सहकार्याबद्दल प्रशंसा करुन साथी पोर्टलची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे संपुर्ण देशातील प्रथम राज्य असल्याचे अवगत केले. तर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी महाबीजसोबत विद्यापिठांचा प्रदीर्घ सहवास असून वातावरणास अनुकूल वाणांचे संशोधन करुन महाबीजमार्फत शेतकऱ्यांचे उत्पादनात कशी वाढ करता येईल तसेच जैविक खतांचा वापर करुन जमिनीचे खालावलेल्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

      जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांनी महाबीजने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्ण बियाणे वाजवी दरात उपलब्ध करुन दिले ही फार कौतुकास्पद बाब असून बियाणे वाटप करतांना कोणतीही अडचण आल्यास किंवा मदत लागल्यास पोलीस विभागाची सहकार्याची भुमिका असेल असे आश्वासीत केले. 

      व्यवस्थापकीय संचालक  योगेश कुंभेजकर यांनी आपले अध्यक्षीय भाषणात आजपर्यंत महाबीजला लाभलेले अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विशेष घडामोडींचा उजाळा करुन दिला. तसेच सुरुवातीस केवळ चार जिल्ह्यात असलेले महाबीजचे कार्य 1980 ते 1984 या कालावधीत आदरणीय तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक महाबीज विश्वासराव धूमाळ यांनी केंद्र सरकार व राज्य शासनाकडे सतत पाठपूरावा करुन महाबीज कार्याचा विस्तार राज्यभर केल्याचे विषद करुन सुवर्ण महोत्सव विशेषकांकरीता अथक परिश्रम करणाऱ्या चमूंचे कौतूक करुन पुरस्कार प्राप्त कर्मचारी / अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

      तसेच महाबीज सुवर्ण महोत्सवी वर्षात महाबीज व शेतकऱ्यांकरीता वर्षभर सकारात्मक उर्जा निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे अवगत केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन किशोर बळी यांनी तर आभार प्रदर्शन  जितेंद्र सरोदे यांनी केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

00000

 

जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून जीडीसी अँड ए व सी एच एम प्रमाणपत्र व गुणपत्रिका घेऊन जाण्याचे आवाहन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सहकार विभागामार्फत माहे मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी.ॲन्ड ए. व सी.एच.एम. परिक्षार्थीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिके सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाकडून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. तरी संबंधित परिक्षार्थिंनी गुणपत्रिका व प्रमाणपत्र घेणेसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय ईमारत, ई ब्लॉक, पहिला मजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन प्राप्त करुन घेण्यात यावे असे जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था, किरण गायकवाड यांनी कळविले आहे.

00000

क्रीडा कार्यालयामार्फत विविध मैदानी खेळाच्या क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र व्दारा मैदानी कबडडी, फुटबॉल, कुस्ती, तलवारबाजी,खो-खो, धनुर्विद्या या खेळाचे क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक 5 मे 2025 ते 20 मे 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर, शासकीय मैदान नेहरु नगर विजापुर रोड सोलापूर, वालचंद कॉलेज, श्रीकृष्ण कुस्ती केंद्र मरिआई चौक सोलापूर, इंडियन मॉडेल स्कूल, पार्क मैदान, दयानंद कॉलेज येथे आयोजित करण्यात आले आहे.

परिक्षा कालावधीनंतर उन्हाळयात दीर्घ सुट्टीमध्ये विदयार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुणांना वाव देण्याकरिता प्रति वर्षाप्रमाणे मैदानी, कबडडी, फुटबॉल, कुस्ती, तलवारबाजी, खो-खो,  धनुर्विद्या खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षण शिबीराकरिता तज्ञ व अनुभवी मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सूर्यनमस्कार, सर्वांगसुंदर व्यायाम, योगासने, प्राणायाम, अॅरोबिक्स, मनोरंजनात्मक खेळ व व्यक्तीमत्व विकास या बांबीवर विशेष भर दिला जाणार आहे.

या शिबीरात सहभागी होणा-या विदयार्थ्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. तरी सोलापूर शहर व जिल्हयातील सहभागी होऊ इच्छिणा-यांना आपली नांवे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कुमठा नाका सोलापूर येथे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी  दत्तात्रय वरकड (संपर्क क्रमांक: 7219155252) यांचेकडे नोंदवावी, प्रशिक्षण शिबीर वेळ :- सकाळी 6.30 ते 8.30  सांयकाळी  4.30 ते 6.30 वाजेपर्यत असेल असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

00000


Reactions

Post a Comment

0 Comments