सोलापूरच्या समस्यांवर आता 'ऍक्शन मोड': आयुक्तांची अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या समवेत आज सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त तैमुर मुलाणी, उपायुक्त आशिष लोकरे, नगररचना विभाग प्रमुख मनिष भुष्णुरकर, पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे, सहाय्यक आयुक्त, सह्यायक अभियंता प्रकाश दिवाणजी, तपन डंके तसेच सोलापूर महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सोलापूर शहराच्या विकासाशी निगडीत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुल, दुहेरी जलवाहिनी तथा नियमित पाणीपुरवठा, अलीकडील बांधकाम परवाना घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई, अक्कलकोट एम.आय.डी.सी.मधील तथा होटगी रोड इंडस्ट्रीयल इस्टेट मधील पायाभूत सुविधा, संभाजी चौक ते सीएनएस हॉस्पिटल दरम्यानचा ५४ मीटर रस्ता, आणि शहरातील वाढती मटका, मावा, अनधिकृत बॅनर्स व मिरवणुकांची समस्या यांचा समावेश होता.
तसेच, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे ऑडिट, JNNURM बस घोटाळ्याची चौकशी, महानगरपालिकेच्या जलतरण तलावांचे कंत्राटीकरण, ओपन स्पेसचा उत्पन्नक्षम उपयोग, महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाचा CSR निधीतून विकास, नवीन बांधकामांना झाडे लावण्याची सक्ती, रस्त्यांवरील अजोरा हटवणे, मृत पाळीव प्राण्यांसाठी अंत्यसंस्कार सुविधा, नवीन विकास आराखड्यावरील नागरिकांच्या सूचनांचा विचार व 'जुळे सोलापूर प्राधिकरण' स्थापनेचा प्रस्ताव या विषयांवरही शिष्टमंडळाने सविस्तर मांडणी केली.
आयुक्त डॉ. ओंबासे यांनी सोलापूर विकास मंचच्या वतीने मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांचा सकारात्मकपणे विचार करत, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी प्रशासनाच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचेही यावेळी सांगितले.
या बैठकीमुळे शहराच्या अनेक समस्यांवर प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोलापूर विकास मंचने प्रशासनाला यापुढेही पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, केतन शहा, विजय कुंदन जाधव, सुहास भोसले, प्रशांत भोसले, प्रसन्न नाझरे, इक्बाल हुंडेकरी, आनंद पाटील, आरती अरगडे, भारत पाटील, शुभदा पाटील आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.
0 Comments