कट्टर विरोधक एकत्र, फडणवीसांच्या लाडक्या आमदारासमोर कडवं चॅलेंज
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला असून भाजपामधील दोन कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सुभाष देशमुखांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या आमदारासमोर आव्हान उभे केले आहे.
भाजपाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन सोलापूर (Solapur) बाजार समितीची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्या निर्णयाला भाजपाचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध दर्शवला आहे.
कल्याण शेट्टी यांच्या निर्णयावर संताप व्यक्त करत काँग्रेससोबतची युती मान्य नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. भाजप कार्यकर्त्यांसाठी आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देशमुख यांनी केली आहे.
सुभाष देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केले असतानाच आज विजयकुमार देशमुख यांनीही आपली भूमिका जाहीर केली आहे. देशमुख यांनी भाजप आमदार सुभाष देशमुखांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांसाठी कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही देशमुख एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे,मागील निवडणुकीत विजयकुमार देशमुखांनी काँग्रेस नेत्यांसोबत जाऊन निवडणूक लढवली होती. मागील तीन वर्षांपासून बाजार समितीचे सभापतीपद भूषवले होते.
यावेळी मात्र बाजार समितीची सूत्रे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे गेली आहे. त्यानंतर मात्र आमदार विजयकुमार देशमुखांनी आमदार सुभाष देशमुखांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीतून मी माघार घेतली आहे. पण, पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी सुभाष देशमुख यांच्यासोबत असणार आहे. आमदार सुभाष देशमुख हे जर भाजपचे पॅनल उभे करत असतील तर मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये उभी फूट
बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे .भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमदार सुभाष देशमुख यांनी संताप व्यक्त करत काँग्रेस सोबतची युती मान्य नसल्याचे जाहीर केले.
तसेच, भाजप कार्यकर्त्यासाठी आपण स्वतंत्र पॅनेल उभा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आज बाजार समितीचे माजी सभापती विजयकुमार देशमुख यांनीही भाजप कार्यकर्त्यांसाठी देशमुखांसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे दोन देशमुख एकीकडे, तर सचिन कल्याणशेटृटी हे एका बाजूला झाले आहेत. कल्याण शेट्टी यांच्यासोबत पत्रकार परिषदेला आलेले देवेंद्र कोठे यांची भूमिका मात्र गुलदस्तात आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादीही देशमुखांसोबत...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी निवडणुकीतून माघार घेत सुभाष देशमुख यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशमुख यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
0 Comments