Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात पाणीटंचाईचं संकट; धरणांमध्ये केवळ 41% साठा शिल्लक

 महाराष्ट्रात पाणीटंचाईचं संकट; धरणांमध्ये केवळ 41% साठा शिल्लक




उजनी धरणात केवळ २ टीएमसीच जिवंत पाणीसाठा

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, कारण महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेषतः पुण्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून, पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये केवळ 36.31 टक्के पाणीसाठा उरला आहे.

पावसाळा सुरु होण्यासाठी अजून खूप कालावधी बाकी आहे , अशा परिस्थितीमध्ये जलसाठ्यामधील पाणी कमी होणे , हि चिंताजनक बाब आहे. यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

महाराष्ट्रात लहान मोठी मिळून एकूण 2 हजार 997 धरणे -

महाराष्ट्रात लहान मोठी मिळून एकूण 2 हजार 997 धरणे असून, त्यांची एकत्रित साठवण क्षमता 40,498 दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, यामध्ये केवळ 30,034 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे 42 टक्केच पाणीसाठा उरलेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 35.16 टक्के पाणीसाठा होता, त्यामुळे यंदाचे प्रमाण थोडे जास्त असले तरी परिस्थिती गंभीरच आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू -

राज्य सरकारने ग्रामीण अन अर्थ-ग्रामीण भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. एका आकडेवारीनुसार, सध्या राज्यात 223 टँकर कार्यरत आहेत, जे 178 गावे आणि 606 वाड्यांना पाणीपुरवठा करत आहेत.

पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन -

राज्यभरात तापमान झपाट्याने वाढत असून, पावसाला अजून वेळ असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. सर्व जिल्ह्यांतील पाणी साठ्यांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे आणि गरज पडल्यास आणखी टँकर सेवा वाढवण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत चालला आहे. त्यानुसार उजनी धरणाची वाटचाल देखील आता मृत पाणी साठ्याकडे जात असून पुढील दोन दिवसात उजनी धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे.

धरणात केवळ २ टीएमसीच जिवंत पाणीसाठा शिल्लक असून पुण्यासह सोलापूर व अहिल्यानगर जिल्हा वासियांची चिंता वाढणार आहे.

पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण पुढील दोन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस आहे. म्हणजे उजनीमध्ये केवळ दोन टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा राहिला आहे. त्यानंतर धरण हे मृत पाणी साठ्यात जाणार आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदीपात्रामध्ये सहा हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या ६५ पूर्णांक ५७ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.

धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे तिन्ही जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला होता. दरम्यान भीमा नदी काठावरील गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याने धरणातून भीमा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे देखील धरणातील पाणी साठा कमी होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम देखील धरण साठ्यावर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments