एसटी प्रवास झाला असुरक्षित,धोकादायक प्रवास ठरू शकतो जीवघेणा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या येथील आगारात अनेक एसटी गाड्यांच्या बाजूचे पत्रे फाटले असतानाही प्रवासी सेवेसाठी या गाड्या वापरल्या जात आहेत. प्रवाशांचा हा धोकादायक प्रवास इतरांनाही जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे नादुरुस्त अवस्थेतील गाड्या तत्काळ सेवेतून हटविण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून अनेक वर्षे नवीन गाड्यांची खरेदीच झाली नाही. जुन्या गाड्यांवरच प्रवासी सेवेचा डोलारा चालू राहिला. मात्र, अलीकडेच नवीन गाड्यांची खरेदी होऊन प्रत्येक आगाराला ५ ते १०गाड्या दिल्या जात आहेत. बार्शी व अक्कलकोट या दोन आगारांना प्रत्येकी १० नवीन एसटी गाड्या मिळाल्या. सोलापूरच्या मध्यवर्ती आगारासाठी केवळ पाच गाड्या पाठविण्यात आल्या.
सोलापूर हे मुख्यालय असतानाही या आगाराला नवीन जादा गाड्या मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकीय इच्छाशक्ती दाखविली नाही. त्यामुळे जुन्या आणि नादुरुस्त असलेल्या एसटी गाड्यातून नागरिक धोकादायक प्रवास करीत आहेत. अनेक एसटी गाड्यांचे पत्रे दोन्ही बाजूला फाटलेले आहेत. काही गाड्यांचे पत्रे लोंबकळत असताना दिसतात. अनेक गाड्यांच्या खिडक्यांना काचा नाहीत. चालकाच्या समोरील काचास तडे गेले आहेत. अशा गाड्या मार्गावर सोडल्या जाऊ नयेत. प्रवाशांचा जिवाशी खेळण्याचा उद्योग अधिकाऱ्यांनी थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0 Comments