यंत्रमाग कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या सरकार विरुद्ध लढा तीव्र करू - कॉ आडम मास्तर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंत्रमाग कामगार आपल्या उदरनिर्वाहासाठी बारा बारा तास कारखान्यात राबतो त्या कामगाराला आजही वेठबिगारी सारखी वागणूक मिळते. यंत्रमाग चालतो तेव्हा कापड विणले जात नाही तर त्यामध्ये कामगारांचा घाम आणि संघर्षाची गुंफण असते. याची जाणीव या गेंड्याची कातडी असणाऱ्या सरकार ला होत नाही. यंत्रमाग कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या सरकार विरुद्ध लढा तीव्र करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी दिला.
गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सीटू चे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे महाराष्ट्र राज्य पॉवरलूम वर्कर्स फेडरेशनची राज्यस्तरीय बैठक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत इचलकरंजी ,मालेगाव भिवंडी आणि सोलापूर मधून प्रतिनिधी सहभाग नोंदवले. यावेळी सिटू चे राज्य महासचिव ॲड एम एच शेख, कॉ भरमा कांबळे, सुनील चव्हाण, व्यंकटेश कोंगारी, किशोर मेहता आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात गेल्या पाच दशकाहून अधिक वर्षापासून विणकर अर्थाअर्थी यंत्रमाग कामगारांचा लढा अव्याहतपणे सुरू आहे. यंत्रमाग कामगारांना ओळखपत्र, हजेरीकार्ड, आठ तास, अतिरिक्त कामाचा मोबदला,कामगार कायद्याचे लाभ, सामाजिक सुरक्षा, बोनस ,हक्करजा, वैद्यकीय सुविधा,निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी,कामगारांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती,आरोग्य विमा,अपघात विमा मिळाले पाहिजे, महागाई निर्देशांकानुसार व फरकासह किमान वेतन,रोजगार हमी व रोजगार सुरक्षा तसेच माथाडी कामगारांच्या धर्तीवर आधारित यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळांची स्थापना करण्यात यावी या मागण्या घेऊन सीटू अविरत लढा देत आहोत.मात्र कोणत्याही विचाराचे किंवा कोणत्याही पक्षाचे सरकार येऊ द्या यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.हा अन्याय आता कामगार कदापि सहन करणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी केले.
यंत्रमाग कामगारांच्या प्रलंबित मागण्या, कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल आणि यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करणे या प्रश्नांना घेऊन 13 जून रोजी मालेगाव येथे एक दिवसीय राज्यस्तरीय विशेष अधिवेशन होणार आहे.या अधिवेशनात पुढील लढ्याची दिशा व कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे.तसेच यंत्रमाग कामगारांच्या 1 लाख सह्यांचे संकलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
0 Comments