सोलापुरातील बौद्ध साहित्य संमेलनाचे भीमराव आंबेडकर यांना निमंत्रण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे निमंत्रण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांना देण्यात आले.
सोलापुरात शनिवार दि. 3 मे 2025 रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, समन्वयक डॉ. सुरेश कोरे, कार्यवाह भालचंद्र साखरे यांच्या हस्ते त्यांना निमंत्रण पत्र देण्यात आले. शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, प्रफुल्ल जानराव, मुख्याध्यापक विनोद वर ,अविनाश भालशंकर, रंजीत माने, अशोक कांबळे आदींसह पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने क्रांतीप्रवण झालेल्या सोलापूर नगरीत राज्यस्तरीय स्वरूपाचे हे बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे, याचा आनंद होत आहे. अतिशय मोठे आदर्शवत कार्य सोलापूरकरांनी हाती घेतले आहे. बौद्ध धम्म आणि चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी तसेच विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हे संमेलन महत्वपूर्ण ठरणार आहे. या संमेलनास आवर्जून उपस्थित राहणार आहोत अशा शब्दात डॉ. भीमराव आंबेडकर यांनी होकार देत शुभेच्छा दिल्या.
0 Comments