आपत्कालीन प्रसंगी महापालिकेची अग्निशमन दलाची सेवा विनामूल्य
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- महापालिका हद्दीत आगीच्या घटना घडल्यास किंवा अपघात झाल्यास आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दलामार्फत चोवीस तास विनामूल्य सेवा उपलब्ध राहील, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
१४ ते २० एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यात अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने कन्ना चौकातील अग्निशामक केंद्र येथे ओम्बासे यांच्या हस्ते अग्निशामक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त मनीषा मगर, सहायक आयुक्त गिरीश पंडित, मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, सहायक अग्निशमन अधिकारी अच्युत दुधाळ तसेच अग्निशमन विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.
१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट स्टिकिन या जहाजामध्ये दारूगोळा, सोने, कापसाच्या गंज्या यांना आग लागून मोठा स्फोट झाला. ही आग विझवताना मुंबई अग्निशामक दलातील ६६ कर्मचाऱ्यांना वीरमरण प्राप्त झाले. तसेच अग्निशमन कार्य करताना हुतात्मा झालेल्या अग्निशमन दलातील अग्निशमन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येतो.
यावेळी अग्निशमन दल प्रमुख राकेश साळुंखे यांनी अग्निशमन दलाकडे सर्व मिळून दहा गाड्या असून त्यापैकी एक मिनी फायर फायटरचा उपयोग गल्लीबोळाल आग विशविण्यासाठी होतो. एक रेस्क्यू व्हॅन आहे. दोन फोम टेंडर फायर फायटर गाड्या असून याचा उपयोग विमानतळ बंदोवस्त अथवा केमिकलच्या आगी विझवण्याकरिता केला जातो. पाच वॉटर टैंडर या गाड्यांचा उपयोग सर्वसाधारण आगी विझवण्याकरिता केला जातो. आपत्ती व मदत पुनर्वसन मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून मिनी रेस्क्यू टैंडर विनामूल्य प्राप्त झाले आहे. याप्रसंगी अग्निशमन जवानांनी आग विझविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाची सेवा ही नागरिकांच्या जीविताच्या व मालमत्तेच्या संरक्षणाकरिता २४ तास विनामूल्य उपलब्ध आहे. सोलापूर शहरात एकूण ५ ठिकाणी अग्निशामक केंद्रे आहेत. यामध्ये रविवार पेठ, मुख्य अग्निशामक केंद्र (१०१, ०२१७-२७४०३६४), भवानी पेठ, अग्निशामक केंद्र (०२१७-२७४०३६७), सावरकर मैदान, अग्निशामक केंद्र (०२१७-२७४०३६८). होटगी रोड, अग्निशामक केंद्र (०२१७-२७४०३८९), अक्कलकोट रोड, एमओडीसी अग्निशामक केंद्र (०२१७-२७४०३६६) व मुख्य अग्निशमन अधिकारी (९४२२४५७९३६) यांचा समावेश आहे.
0 Comments