Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रिसीजनने केला कासेगावला पाणीदार बनवण्याचा संकल्प

 प्रिसीजनने केला कासेगावला पाणीदार बनवण्याचा संकल्प



सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- समृध्दी ग्रामविकास अभियानांतर्गत कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे प्रिसीजन कॅमशाफ्टस लिमिटेड आणि सेवावर्धिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाणलोट विकासाच्या कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचा उद्देश म्हणजे डोंगराच्या माथ्यापासून ते शेवटच्या शेतापर्यंत जलसंधारणाची शाश्वत तंत्रे राबवून संपूर्ण परिसराचा पाणलोट क्षेत्र म्हणून विकास करणे हा आहे.

कार्यक्रमाची प्रस्तावना सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश देगावकर यांनी केली. त्यांनी अभियानाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट करत प्रिसीजन कॅमशाफ्टस लिमिटेड कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून केलेल्या सहकार्याची माहिती दिली.

प्रिसीजन फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी शाश्वत जलसंधारण हे ग्रामविकासाचे मूलभूत अंग असून, प्रिसीजन कॅमशाफ्टस लिमिटेड कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करीत आहे. येत्या तीन वर्षात ही जलसंधारणाची कामे होणार असून गावकऱ्यांचा सहभाग गरजेचा आहे, असे सांगून प्रकल्पासाठी निधी देण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

डॉ. श्रीनिवास वडकबाळकर यांनी पाणलोट क्षेत्र विकासाचे तांत्रिक, पर्यावरणीय आणि सामाजिक फायदे उलगडून सांगितले. डॉ. अजित देशपांडे यांनी, कोरडवाहू शेतीच्या आव्हानांवर उपाय सुचवत शाश्वत शेतीची दिशा स्पष्ट केली. त्याचबरोबर ज्यांच्याकडे भरड शेती आहे अशा शेतकऱ्यांनी वृक्ष शेतीकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी प्रिसीजन कॅमशाफ्टस लिमिटेडचे सहायक जनसंपर्क अधिकारी वैशाली बनसोडे, विनायक दुधगी, सरपंच यशपाल वाडकर, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, नेताजी पाटील, सरकार पाटील, विलास वाडकर, मल्लिनाथ येणगुरे, श्याम इटुकडे, शहाजान शेख, मोहन जाधव, जालिंदर गायकवाड, दत्तात्रय काटकर, लक्ष्मण ढेकळे, निशिकांत पाटील, प्रदीप माने, भरत चौगुले, भरत जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चन्नवीर बंकुर यांनी प्रभावीपणे पार पाडले. शेवटी गावाचे सरपंच यशपाल वाडकर यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments