Hot Posts

6/recent/ticker-posts

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कल्याणशेट्टी, माने, शिवदारे, हसापुरे एकत्र

 बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कल्याणशेट्टी, माने, शिवदारे, हसापुरे एकत्र



मंद्रूप (कटुसत्य वृत्त):- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण तसेच आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, माजी संचालक बाळासाहेब शेळके, माजी उपसभापती श्रीशेल नरोळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील हे सर्व नेते एकत्रित आलो असून निवडणुकीत सर्वपक्षीय महाआघाडी उभारण्यात येत असल्याची घोषणा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.

सोमवारी, बाजार समिती निवडणुकीसाठी सर्वपक्षीय महाआघाडीची माहिती देण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, सोलापूर बाजार समिती ही राज्यातील मोठी बाजार समिती आहे. या समितीत शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत, बाजार समितीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार आपण सर्वपक्षीय नेत्यांची महाआघाडी उभारत आहोत. रविवारी रात्री उशिरापर्यंत आमच्या सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली. आम्ही सर्वजण मिळून ही निवडणूक लढवू, जागावाटप लवकरच करून १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर करणार आहोत. निवडणुकीनंतर सभापती, उपसभापती संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.

आमदार सुभाष देशमुख यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे आम्ही देशमुख यांना सांगितले आहे. देशमुख यांनी आमच्यासोबत यावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे. निवडणूक बिनविरोध झाली तर उत्तमच आहे. मात्र, तसे न झाल्यास आम्ही सर्वजण मिळून ही निवडणूक लढणार आहोत, असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.

यावेळी माजी आमदार माने म्हणाले, बाजार समितीत शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहोत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची आम्हाला गरज आहे. म्हणून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पाहता आपण सहकार क्षेत्रात सक्षम आहोत. मात्र, कधी कधी शेतकरी आणि बाजार समितीच्या विकासासाठी महाआघाडीत आलो आहे. सर्वजण मिळून आम्ही ताकदीने ही निवडणूक लढविणार आहोत, असे त्यांनी
सांगितले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे म्हणाले, शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि त्यांच्या संदर्भात चांगले निर्णय घेण्यासाठी आम्ही कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलो आहोत. सहकार क्षेत्रात राजकीय पक्षांचा संबंध येत नाही. त्यामुळे भाजप-काँग्रेस असा प्रश्नच निर्माण होत नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख आमच्या सोबत होते. यावेळी आम्ही कल्याणशेट्टी व कोठे यांच्यासोबत आहोत. जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, बाजार समिती व सहकार क्षेत्रातील निवडणुका या पक्ष विरहीत लढविल्या जातात. म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत असे त्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments