विद्यमान आमदार, खासदारांनी पाच महिन्यांत बार्शी तालुक्यासाठी किती निधी आणला?
बार्शी / (कटुसत्य वृत्त):- गेल्या पाच महिन्यांपासून खासदारांची नौटंकी तर विद्यमान आमदार यांचा रुबाब व फोटो सेल्फी सुरू आहेत. बार्शी तालुक्याच्या विकासाला खीळ बसली असून, विद्यमान खासदार आणि आमदार यांनी बार्शी तालुक्याच्या विकासासाठी किती निधी आणला ते सांगावे, असा प्रश्न माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार दिलीप सोपल यांना विचारला आहे.
दोन दिवसांपूर्वी आमदार व खासदार यांनी एकत्र तालुक्यातील जनतेसाठी आमसभा आयोजित केली होती. यावेळी उपस्थित जनतेने प्रलंबित कामे, समस्यांविषयी प्रश्नांचा भडीमार संबंधित अधिकाऱ्यांवर केला होता. यावेळी जनतेची कामे व अडचणी समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार व खासदारांनी सूचना केल्या होत्या.
यावर माजी आमदार राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले 'ही आमसभा होती का जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याच्या वाईट हेतूनं घेतली होती? तसेच यात प्रश्न विचारणारे देखील काही जण विघ्नसंतोषीपणाने अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होते. ' विधानसभा निवडणूक होऊन पाच महिने उलटले तरी बार्शी तालुक्याच्या विकासासाठी विद्यमान आमदारांनी सांगावे की किती निधी आणला. केवळ खासदारांची नौटंकी तर आमदारांचे फोटो सेल्फी सुरू असल्याचे ते म्हणाले. दोघांना पाच महिन्यानंतर जाग आली हे बरं वाटलं,' असा टोलाही त्यांनी लगावला.
बार्शी तालुक्याच्या विकास कामासाठी अधिकारी नियोजनात योगदान देत होते. तालुका गतिमान होता. मात्र त्याच अधिकाऱ्यांना आमसभेत विनाकारण धारेवर धरलं, धमक्या दिल्या, अशी कामे होत नसतात. उगाच जनतेसमोर रुबाब दाखवायचा ही पद्धत जनतेने ओळखली आहे. विद्यमान आमदार मुंबई आणि पुणे यामध्येच व्यस्त आहेत. गेल्या पाच महिन्यात मुरमाचा खडा टाकण्याइतके देखील पैसे या बार्शी तालुक्यात आणले नाहीत. मात्र नवखा विद्यार्थी असल्यासारखं मंत्रालयात जाऊन मंत्र्यांसोबत फोटोसेशन सुरू आहे, आणि ते काढलेले फोटो सोशल मीडियात टाकण्याचे काम सुरू आहे, असेही माजी आमदार राऊत म्हणाले.
'तर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडून केवळ नौटंकी सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले. खासदार ओमराजे यांनी त्यांच्या मागील टर्म व चालू टर्ममध्ये बार्शी तालुक्यासाठी किती निधी आणला अथवा केंद्राचा एखादा प्रोजेक्ट आणला का ते सांगावं.'
'कारण नसताना काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जातंय. अधिकाऱ्यांना कोण हप्ते मागतंय, कोण ब्लॅकमेल करतंय, हेही पाहिलं पाहिजे. कोणत्याही अधिकाऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शेवटी सरकार आपलं आहे. तालुक्याच्या हिताची जी कामे असतील ती करत राहा. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. तुमच्या पाठीशी मी उभा आहे, असे राऊत म्हणाले.
यावेळी माजी सभापती अनिल डिसले, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, विजय गरड, विलास रेणके, संतोष निंबाळकर, कौरव माने, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments