सुधीर खरटमल यांच्यातर्फे भोजने भगिनींचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात क्लार्क म्हणून नियुक्ती मिळविलेल्या संजीवनी आणि सरोजिनी भोजने या भगिनींच्या यशाबद्दल त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी या दोन्ही बहिणींचा सत्कार केला.गवळी वस्तीतील छोट्या पत्र्याच्या घरात भोजने कुटुंबीय राहतात. त्यांचे वडील ज्योतिराम भोजने यांचे लहानसे गॅरेज असून घर चालवण्यासाठी त्यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत होते. त्यांचे धडपड पाहून संजीवनी आणि सरोजिनी यांनी शिक्षणाच्या जोरावर कुटुंबाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचा निर्धार केला. दोन्ही बहिणींनी बीकॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. २०१८ पासून त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. सात वर्षांच्या प्रयत्नांमध्ये तीन वर्षे कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला. तसेच आर्थिक टंचाईमुळे अभ्यासासाठी योग्य सुविधा नव्हत्या. या काळात संजीवनी आणि सरोजिनी यांनी पीएसआय, सेल्स टॅक्स आणि टॅक्स असिस्टंट पदांसाठी परीक्षा दिल्या. पण दरवेळी काही गुणांनी अपयश पदरी पडले. तरीही त्यांनी हार न मानता हे यश प्राप्त केले. त्यामुळे खरटमल यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सूर्यकांत शेरखाने, युवती शहराध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष राकेश सोनी, शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू आदी उपस्थित होते.
0 Comments