जलसंपदा खात्याच्या उदासीन कारभारामुळे बंधाऱ्यातून पाण्याची गळती
[ प्रतिनिधी अकलूज ] जलसंपदा खात्याच्या उदासीन कारभारामुळे आनंदनगर ता.माळशिरस येथील बंधार्यातून पाण्याची गळती न थांबल्याने जानेवारीच्या तोंडावरच या बंधाऱ्याच्या पाण्याने तळ गाठला आहे. यंदा अतिवृष्टी होऊनही अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांना फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. डागडुजी करणाऱ्या ठेकेदाराच्या निकृष्ट कामांना सावरून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अधिकारी करत असल्याचा आरोप येथील शेतकरी करत आहेत.
आनंदनगर येथे नीरा नदीवर ७.५० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे .या बंधाऱ्यावर माळशिरस तालुक्यातील चाकोरे कोंडबावी ,आनंदनगर ही गावे तर इंदापूर तालुक्यातील सराटी, कचरेवाडी व निर निमगाव या गावांमधील सुमारे साडेतीन हजार एकर शेती अवलंबून आहे .या बंधाऱ्याची डागडुजी व पाणी अडवण्यास संदर्भात जलसंपदा खात्याने लक्ष न दिल्याने आजमितीला या बंधाऱ्यात केवळ ३० टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. बंधाऱ्याची दारे बसवताना निष्काळजीपणा केल्याने बंधार्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती आजही होत आहे.त्यामुळे ा बंधार्यातील पाण्याची पातळी रोज घटत चालली आहे. याच्या तक्रारी करूनही अधिकारी दखल घेत नाहीत त्यामुळे जानेवारी अखेरीस हा बंधारा पूर्णपणे रिकामे होण्याची भीती निर्माण झाली असल्याने या परिसरातील शेतकरी चिंतातुर झाला आहे .फेब्रुवारीच्या तोंडावर जर याठिकाणी बंधारा कोरडा पडला तर उन्हाळ्यामध्ये येथे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवणार आहे. यंदा मोठा पाऊसकाळ झाला असला तरी आनंदनगर परिसरातील शेतकऱ्यांवर उन्हाळ्यातील जलटंचाईचे सावट आतापासूनच दाटू लागले आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्याचा शासकीय नियम आहे. परंतु यंदा पाऊस काळ लांबल्याने अगदी नोव्हेंबरपर्यंत निरा नदी दुथडी भरून वाहत होती. नदीच्या प्रवाहाची पातळी पाहून अधिकाऱ्यांनी पाणी अडवायला हवे होते परंतु तसे झाले नाही. येथील शेतकऱ्यांनी त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार विजयसिंह यांनी २१ डिसेंबर रोजी या बंधाऱ्यावर भेट देऊन अधिकाऱ्यांना या संदर्भातील सूचना दिल्या होत्या तरी देखील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये मार्चपर्यंत पाणी टिकायला हवे. पाण्याच्या दाबाने पाणी अडवणारी प्लेट निसटली होती. त्यामुळे पाण्याची गळती झाली आहे. ती प्लेट बसवण्याचा व पोती भरून पाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.आनंदनगर बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला पिठेवाडी येथील बंधाऱ्याची दारे उघडली गेल्याने आनंदनगर बंधाऱ्यात जास्त पाणी आल्याने येथील तिसऱ्या दारावरील प्लेट वाकडी झाली होती. नंतर सर्व दारे काढून ती प्लेट बसवली होती. त्यावेळी पाण्याची गळती झाली होती.
आनंदनगर येथील बंधारा यंदा पूर्ण क्षमतेने भरला गेला नाही .ठेकेदाराने वेळेत दारे टाकली नाहीत. टाकलेल्या दारातून मोठी गळती होत राहिली. वरील सर्व बंधारे भरले मात्र आमचा बंधारा पुन्हा पूर्णपणे भरला नाही. अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. उन्हाळ्यात या परिसराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याला जबाबदार कोण ?यासंदर्भातील जबाबदारी शासनाने निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी व आमचा पाण्याचा प्रश्न सोडवावा.
0 Comments