सांगोल्यात कडकडीत बंद पाळून सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेध
सांगोला (कटूसत्य वृत्त):- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ रविवारी सांगोला येथील नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. सांगोला शहरासह तालुक्यातील १०३ गावांतही कडकडीत बंद पाळून माणुसकीच्या रक्षणासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या मागणीसाठी समाज असल्याचे दाखवून दिले.रविवारी सकाळी सांगोला तालुक्यातील सर्वपक्षीय आणि समाज घटकातील नागरिकांच्या मूक मोर्चाला महात्मा फुले चौकातून प्रारंभ झाला. हा मोर्चा तहसील कचेरीवर नेण्यात आला. तेथे बहुजन समाजाच्यावतीने तसेच सकल मराठा समाज सांगोलाच्यावतीने संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधाचे पत्रक देण्यात आले. त्यामध्ये मारेकऱ्यांना विठाई भेंक फाशीची शिक्षा व्हावी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, महिलांवरील अन्यायाबाबत तत्काळ न्याय देण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी,महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, सांगोला पोलिसांनी गस्त घालून चुकीचे काही आढळल्यास त्वरित कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांना देण्यात आले. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर मूक मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले. त्या सभेत मराठा समाज व बहुजन समाजाचे नेते सर्व अरविंद केदार, यश राजे,साळुंखे पाटील,वैभव केदार, नागेश जोशी, किशोर बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, डॉ. विजय बंडगर, माजी प्राचार्य बजरंग दिघे, अभिषेक कांबळे, विनोद बाबर आणि स्वाती मगर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.मोर्चाप्रसंगी सागर पाटील, रमेश जाधव,बापू भाकरे, तानाजी बनसोडे, राम बाबर, गुंडा खटकाळे, दीपक बनसोडे आदी मराठा सकल समाज व बहुजन समाजचे शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस होता. सांगोला येथील खिलार जनावरांचा व आठवड्याचा बाजार होता; परंतु बंदमुळे जनावरांचा बाजार तसेच भाजीपाला, इतर सर्व बाजारात कडकडीत बंद पाळण्यात आला. महुद बुद्रुक, जवळा, महुद, कडलास, सोनंद, वाटंबरे, मेडशिंगी या मोठ्या गावांसह तालुक्यातील बहुतांश १०३ गावांत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला.
0 Comments