Hot Posts

6/recent/ticker-posts

आयशर टेम्पोच्या धडकेत मांगी गावचे मा. उपसरपंच सुभाष शिंदे यांचा मृत्यू

 आयशर टेम्पोच्या धडकेत मांगी गावचे मा. उपसरपंच सुभाष शिंदे यांचा मृत्यू





करमाळा (कटूसत्य वृत्त):-
            जातेगाव- टेंभुर्णी या महामार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात होण्याचे सत्र सुरुच आहे. करमाळा तालुक्यातील मांगी गावचे मा.उपसरपंच सुभाष नामदेव शिंदे (वय-54) हे जातेगावकडील त्यांच्या शेतातून सकाळी 10 च्या दरम्यान लवकर काम उरकून मांगी या त्यांच्या गावाकडे सायकलीवरून निघाले होते. अहिल्यानगर कडून भरधाव वेगात आलेला आयशर टेम्पो क्र. MH 16 CD 3672 हे वाहन दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करत असताना, सुभाष शिंदे यांना जोराची धडक देऊन तसेच निघून गेले. यानंतर गावातील युवकांनी लगेच शिंदे यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलविले व फरार आयशर टेम्पोचा काही जणांनी पाठलाग केला. यानंतर आयशर टेम्पो चालकाने करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या गेटसमोर वाहन लावून, करमाळ्यात भरणाऱ्या शुक्रवारच्या बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत पोबारा केला. यादरम्यान शिंदे यांना दवाखान्यात दाखल करेपर्यंत वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे तपासणी अंती डाॅक्टरांकडून सांगण्यात आले. आयशर टेम्पोच्या चालकाने वाहनातून फरार होण्यापूर्वी वाहनाला लाॅक करुन पोबारा केला होता. यानंतर गाडीच्या नंबरवरून वाहन मालकाला पोलीसांनी संपर्क साधून, आयशर टेम्पो करमाळा पोलीस स्टेशन येथे सायंकाळी 6 च्या दरम्यान दाखल करण्यात आला.

चौकट....
         जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले गेले आहे. सदरच्या मार्गासंबंधीत तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी रुंदीकरणासाठी प्रयत्न करुन मंजूरी मिळविली असल्याचे प्रसिद्धी माध्यमातून सांगण्यात आले होते. व तशाप्रकारचे ‍मोठे बॅनर देखील तालुक्यात झळकविण्यात आले होते. परंतू ह्या मार्गाची दयनीय अवस्था फक्त बॅनरवरच सुधारलेली दिसली. आता नवीन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील या मार्गासंदर्भात मागील काही दिवसांपुर्वी करमाळ्यातील कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सकारात्मकता दाखविली होती. परंतू सदरचे रखडलेल्या मार्गाचे कधी रुंदीकरण होणार? किंवा किती जीव गेल्यावर प्रशासन व सरकार या महामार्गाकडे लक्ष देणार? हा सर्वसामान्य नागरिकांमधून प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments