सोलापूरात अवकाळी पावसाची हजेरी
पारा पुन्हा ४० अंश सेल्सिअस पार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व परिसराच्या कमाल तापमानात आज वाढ झाली आहे. चाळीस अंश सेल्सिअसच्या आत असलेले तापमान आज ४० अंश सेल्सिअस पार झाले आहे. बुधवारी सोलापुरात ४०.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.
त्यानंतर गुरुवारी ३९.५, शुक्रवारी ३८.८ व शनिवारी ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज सोलापुरात ४०.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
तीन दिवसानंतर आज सोलापुरात तापमानाचा पारा वाढला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण व किरकोळ अवकाळी पावसामुळे सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. वातावरणातील बदलामुळे आता सोलापूरच्या तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढला आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच सोलापुरच्या तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला आहे. आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढू लागला आहे.
सोलापुरात एप्रिलमध्ये कडक उन्हाळा अनुभवायला मिळतो. तापमान वाढल्यानंतर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस होत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. मोहोळ व अक्कलकोटसह जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अवकाळी पावसाचे प्रमाण घटले आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात द्राक्षाच्या बागा अंतिम टप्प्यात असल्याने या पावसाचा फटका बागांना बसतो. यावेळी अवकाळी पावसाच्या संकटातून जिल्ह्यातील द्राक्ष व आंब्याच्या बागा वाचल्या आहेत.
0 Comments