महिलांनी न डगमगता पुढे गेले पाहिजे- स्मिता पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 10, 2025

महिलांनी न डगमगता पुढे गेले पाहिजे- स्मिता पाटील

 महिलांनी न डगमगता पुढे गेले पाहिजे- स्मिता पाटील




श्रमिक पत्रकार संघात माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिलांना प्रत्येक वेळी समाज व्यवस्थेने प्रोत्साहन दिले आहे. देवी नव्हे तर महिला म्हणून समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. महिला सक्षमपणे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांनी न डगमगता पुढे गेले पाहिजे. केवळ महिला दिनच नव्हे तर प्रत्येक दिवशी महिलांसाठी जगण्याचा महोत्सव साजरा व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले. 
            जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा चित्रा कदम यांच्या हस्ते माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विचार मंचावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे , सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
         उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील पुढे म्हणाल्या, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांनी छत्रपती शिवरायांना घडविले.
महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी महिलांच्या हातात पुस्तक देऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे केले. ऋषीमुनींच्या काळातही विद्वान महिला होत्या. आज विविध क्षेत्रात महिला या धैर्याने काम करत आहे. आपला वेगळा ठसा उमटविला आहे. कौटुंबिक आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या महिलांना पार पाडाव्या लागतात. यामध्ये कुटुंबाकडे दुर्लक्ष व्हायला नको, असेही त्या म्हणाल्या.
         प्रास्ताविक सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. पत्रकार अश्विनी तडवळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी सत्कारमूर्ती महिलांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध माध्यमातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

समाज घडविण्याचे महान कार्य
 महिलांकडून घडते : चित्रा कदम

कार्याध्यक्षा चित्रा कदम यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला दिन हा दररोज साजरा झाला पाहिजे. महिलांचा सन्मान केला पाहिजे. महिला या विविध क्षेत्रात धैर्याने, जिद्दीने, चिकाटीने आपला ठसा उमटवीत आहेत. कुटुंबाबरोबरच समाज घडविण्याचे महान कार्य महिलांकडून घडते. त्यांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages