नातेपुते महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांचे मोरोचीत श्रमसंस्कार शिबिर,रॅलीद्वारे समाज प्रबोधन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना यांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मोरोची तालुका माळशिरस येथे संस्थेच्या चेअरपर्सन विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पद्मजादेवी मोहिते पाटील, धवलसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे. दिनांक ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणाऱ्या या श्रमसंस्कार शिबिरामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोरोची गावातून रासेयो च्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून गावात मतदान जनजागृती बरोबर समाज प्रबोधन केले जात आहे. तसेच शिबिरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज, महिला सशक्तिकरण व बालविवाह व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धन, डिजिटल लिटरेसी, आजचा युवक व राष्ट्रीय सेवा योजना या विविध विषयावरती नामांकित व्याख्याते विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना व्याख्यान देत आहेत. तसेच रासेयोच्या विद्यार्थ्यांनी मोरोची गावातील स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य केंद्र, धार्मिक मंदिरे, समाज मंदिरे, कब्रस्तान इत्यादी ठिकाणी स्वच्छता करून अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले तसेच रासेयोच्या विद्यार्थिनींनी मोरोची गावातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला. शिबिरातील सर्व विद्यार्थी यांनी शिवारभेट करून शेती पिकाविषयी शेतकऱ्याकडून मार्गदर्शन करून घेतले. विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. सदर कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.रज्जाक शेख तसेच रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीशचंद्र मुळीक, प्रा. उत्तम सावंत, प्रा.डॉ. सुनिता सुर्यवंशी हे पहात आहेत.

0 Comments