ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांना जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचा
ॲड. त्र्यंबकदास झंवर राज्यस्तरीय पुस्कार जाहीर
लातूर (कटूसत्यवृत्त):-लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचा अॅड. त्र्यंबकदास झंवर राज्यस्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार सोलापूरचे आदर्श वाचनालय मासिकाचे संपादक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांना दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाची हुतात्मा स्मारक कार्यालयात ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र प्रभाकर कापसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन घेणे, ग्रंथपालन वर्गाचे उद्घाटन, जिल्हाधिकारी कार्यालयास ग्रंथ भेट देणे, जिल्हा ग्रंथालय संघाची वार्षिक संस्था व सदस्य नोंदणी करणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कै. मारुती चिरके आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविणे आदी विषयांवर चर्चा झाली तसेच या सन २०२४ अँड. त्र्यंबकदास झंवर राज्यस्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार ( रुपये अकरा हजार रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र ) देण्यासंदर्भात आलेल्या विषयावर चर्चा होऊन सोलापूरचे कुंडलिक मोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह ग्रंथमित्र राम मेकले यांनी केले. ग्रंथमित्र काशिनाथ बोडके यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे स्वीकृत सदस्य म्हणून राजकुमार सोनी व नागनाथ बिराजदार यांची निवड करण्यात येवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे सदस्य ग्रंथमित्र सूर्यकांत सिरसे,ग्रंथमित्र जहांगीर सय्यद, बाळकृष्ण होळीकर, अजित पाटील, घोगरे, तसेच ग्रंथमित्र संजय सूर्यवंशी आदी होते.
0 Comments