Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात संतापाची लाट, युट्युबर 'रवींद्र पोखरकर' यांच्यावर गुन्हा दाखल का केला ?

 महाराष्ट्रात संतापाची लाट,

 युट्युबर 'रवींद्र पोखरकर' यांच्यावर गुन्हा दाखल का केला?


जेथे करावे कीर्तन| तेथे अन्नही न सेवावे ॥ माळ घालू नये गळा । बुका लावू नये भाळा ॥ तट्टावृषभासी दाणा । तृण मागो नयें जना ॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥ 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा वाटा आहे, विशेषतः पुरोगामी विचारांची चळवळ ही वारकरी संप्रदायाने आरंभली. त्याचा इतिहास आणि संत साहित्याचा अभ्यास केला तर विद्रोह करणारे, परंपरेला नाकारणारे, काहीसे चालीरीतीवर आघात करणारे, त्यांचा विरोध करणारे विचार अभंग, ओवी आणि समग्र संत साहित्यात वाचायला मिळतात. कीर्तन परंपरेचा आढावा घेतला तर जाणवतं याला काही शतकांचा इतिहास आहे.

हे सगळ स्पष्ट करण्याचं कारण असं की, त्याच वारकरी संप्रदायाची आजची वाटचाल काही स्वार्थी (संख्या मोठी आहे) लोकांमुळे अगदी नीरस झालीय. कीर्तन या प्रबोधनाच्या, ज्ञानदानाच्या प्रकाराला भ्रष्ट विचारांची कीड लागली आहे. पूर्वी ग्रामीण भागत, खेड्यात हरिनाम सप्ताहात आठ दिवस आनंद साजरा करणारे वारकरी आणि गावकरी आज तीच सप्ताहाची परंपरा पुढे चालवायला "आर्थिक गणितामुळे विरोध करताना दिसतायेत. पूर्वी अन्नदानावर चालणारे हे महोत्सव आज मोठ्या "आर्थिक बोली' आणि "गुत्तेदारीवर चालताना दिसतायेत. "एकमेका साहाय्य करू या विचारांवर चालणारा हा महोत्सव आता एकमेकांना अडचणीत टाकतो आहे. केवळ आनंद, जपनाम आणि उल्हास देणार हरिनाम सप्ताह आज अर्थकारण घुसल्याने नकोसा, कंटाळवाणा वाटतो आहे. पूर्वी फक्त येण्या-जाण्याचा खर्च घेणारी कीर्तनकार मंडळी आज कीर्तनाचा भाव ठरवूनच येतात, ठरलेले पैसे दिले तर वाद झाल्याचे अनेक प्रकार समोर येतायेत. काही महाराजांची र्तनाची फीस ही लाखोंच्या आसपास आहे. तरीही ते तथाकथित समाजप्रबोधनकार, कीर्तनरत्ने आहेत.


'सुपारीबाज, पाखंडी कीर्तनकार महाराज...'
क्या याच विषयावरून सध्या पुरोगामी महाराष्ट्रात घमासान सुरू असून त्याला निमित्त घडलं आहे प्रसिद्ध युट्युबर आणि पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते रवींद्र पोखरकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 299 अंतर्गत शिळ डायघर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला गुन्हा. पोखरकर यांनी 'अभिव्यक्ती' या त्यांच्या युट्यूब चॅनलवर 10 फेब्रुवारी रोजी 'सुपारीबाज, पाखंडी कीर्तनकार महाराज...' या शीर्षकाखाली एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडियोमुळे वारकरी संप्रदायाची बदनामी झाली असून शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे पोखरकरांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रवींद पोखरकर यांच्या मते तो व्हिडिओ सर्व कीर्तनकार किंवा ह.भ.प महाराजांना उद्देशून नाही. राज्यात अजूनही चांगले मार्गदर्शक कीर्तनकार आहेत. वारकरी संप्रदाय हे अध्यात्माचे क्षेत्र आहे. त्याला राजकारणाची सांगड घालण्याचा प्रयत्न काही कीर्तनकारांकडून करण्यात आला. त्या कीर्तनकारांवर तुकोबांच्याच भाषेत टीका केली आहे. अध्यात्म क्षेत्राचा बाजर मांडणाऱ्यांविरोधान ती टीका 
आहे. रवींद्र पोखरकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली अनेक लेखक, सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासह वारकरी संप्रदायातील असंख्य किर्तनकारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. स्वतः पोखरकरांनी 'अटक झाली तरी माझी लढाई सुरूच राहिल अशी भूमिका घेतली आहे. 

युट्युबर रवींद्र पोखरकर यांच्याविरोधात गुन्हा का दाखल झाला?
अध्यात्माची भाड खाऊन, आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा व्यापार करुन हरिकथा सांगणाऱ्या विकाऊ, बिदागीबहाद्दर कीर्तनकारांविषयी रवींद्र पोखरकर यांनी अत्यंत सौम्य शब्दात त्यांच्या 'अभिव्यक्ती' या युट्युबवर एक एपिसोड प्रसारित केला. आपले मत मांडताना पोखरकर यांनी वयोवृद्ध व अत्यंत जाणकार तसेच संत साहित्याचा आणि वारकरी संप्रदायाचा गाढा अभ्यास असलेल्या हभप. दिनकरशास्त्री भुकेले या त्या क्षेत्रातील अधिकारी सत्पुरुषाची मुलाखत घेऊन वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.मात्र वारकरी संप्रदाय समाजाला दिशा देण्याचं काम करत, शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे. तो प्रत्येकासाठी वंदनीय आहे. ते आपल्या श्रद्धेचं स्थान आहे. जर त्यांचा कोणी शिवीगाळ करत अपमान करत असेल, तर अशांना अद्दल घडवणे गरजेचे आहे. त्यामुळे कायद्याचा मार्गानेच त्यांना अद्दल घडवली आहे, असा आरोप भाजपा महाराष्ट्रचे सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे यांनी केला आहे.

पोखरकर यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर संतापाची लाट
पोखरकरांच्या समर्थनार्थ मात्र अनेकजण पुढे आले आहेत. गाथा परिवाराचे निरूपणकार उल्हास पाटील यांनी सांगितले की, पत्रकार रवींद्र पोखरकर हे वारकरी कुटुंबात जन्मलेले असल्याने त्यांच्यावर वारकरी संस्कार आहेत. तसंच वारकरी परंपरेविषयी त्यांना आस्था आणि प्रेम आहे. संतविचार हा त्यांच्या जगण्याचा मूलाधार आहे. पोखरकर जे सांगतात ते साधार सांगतात. त्यांच्या बोलण्यातून, *"तुका म्हणे सत्य सांगे । येवोत रागे येतील ते ॥* हा निर्धार व्यक्त होतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, *"सत्य असत्यासी मन केलें ग्वाही । मानियेले नाही बहुमता ॥ * तत्कालीन परिस्थितीत जे असत्याचा प्रचार, प्रसार करत होते, समाजाला लुटत होते, देवा धर्माच्या नावावर फसवत होते त्यांना तुकाराम महाराज अतिशय कडक शब्दात फटकारतात. आजच्या तुकोबांच्या वारसांची ही जबाबदारी आहे की जे चुकीचं आहे, संतविचाराच्या विरोधी आहे, असत्य आहे, अन्याय्य आहे त्याविरोधात निर्भीडपणे आवाज उठवला पाहिजे. जे समाजाच्या हिताचं आहे ते कोणाची भीडभाड न ठेवता सांगितलं पाहिजे.

वारकरी संप्रदायात गेल्या शतकाच्या सुरुवातीस घुसखोरी सुरू झाली आणि आता ती जवळ जवळ पूर्ण झाली आहे असं जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे दहावे वारस डॉ. सदानंद मोरे सर यांनी आपल्या तुकाराम दर्शन या ग्रंथात सांगितलं आहे. या घुसखोरीचं स्वरूप अतिशय गंभीर आणि वारकरी धर्माला संपणार आहे. आज जाती धर्माच्या नावावर कीर्तनातून द्वेष फैलावणारे कीर्तनकार हे त्या घुसखोरीचं दृश्य रुप आहे. ज्ञानदेव-नामदेव-तुकाराम महाराजांचं नाव घेऊन भेदाभेद पसरवणारे हे कीर्तनकार म्हणजे वारकरी संप्रदायाच्या इमारतीला लागलेली कीड आहे. ते हे अनवधानाने करत नाहीत तर पूर्व करत आहेत. धर्मांध, सत्तांध शक्ती या कीर्तनकारांच्या माध्यमातून आपले स्वार्थी हेतू पूर्ण घेत आहेत. या कीर्तनकारांना भरपूर पैसा एका पक्षाने दिला हे सत्यच आहे. पैशाच्या लोभाने लोकांना नको त्या मार्गाला लावणारे कीर्तनकार सत्ताधारी लोकांनी अक्षरशः भाड्याने घेतले. हेच पोखरकर सांगत आहेत. याबद्दल चीड व्यक्त करत आहेत. ती रास्तच आहे. रवींद्र पोखरकर यांच्याविरुद्ध तक्रार करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. गाथा परिवार रवींद्र पोखरकर यांच्या पाठीशी आहे.

कवी श्रीकांत ढेरंगे यांनी सोशल मीडियावर याप्रकरणी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ते लिहितात की, गावोगाव हरिनाम सप्ताह सुरू झाले आहेत. एरव्हीही ते होतच असतात. शेतीच्या प्रश्नांबद्दल, दुधाच्या प्रश्नाबद्दल, दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या लोकांबद्दल, वाढती बेरोजगारी, सरकारी हुकूमशाहीबद्दल, महिला, दलित, आदिवासी किंवा सामाजिक तेढ निर्माण करण्याबद्दल, सर्व प्रकारच्या महागाईबद्दल, महाराष्ट्रातून उद्योगधंदे इतर फक्त आणि फक्त गुजरातमध्ये पळवून नेण्याबद्दल, इव्हीएमबद्दल, परभणीत झालेल्या जातीय अत्याचारांबद्दल, बीडमधील अपहरण करून अमानवी अशा पद्धतीने केल्या गेलेल्या खुनाबद्दल वा अशा सर्व प्रकारच्या मानवी क्रूरतेबद्दल, अशा सर्व प्रश्नांबद्दल कीर्तनकार बोलणार नाहीत. ते भलतेच अजेंडे घेऊन गावोगाव फिररतील. (अर्थात सन्माननीय अपवाद आहेतच. )

“तर संत तुकोबारायांच्यावर गुन्हा दाखल करणार काय?'
ज्येष्ठ पत्रकार दत्तकुमार खंडागळे यांनी तर संत तुकोबारायांच्यावर गुन्हा दाखल करणार काय?' अशा घणाघाती शब्दांत पोखरकरांविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्यांचा निषेध केला आहे. समाजमाध्यमावर खंडागळे लिहितात की, 'अध्यात्माचा बाजार केव्हाच मांडला आहे यात नवीन ते काय ? आज या बदमाशांनी अध्यात्माला कार्पोरेट लुक दिला आहे. अध्यात्माच्या नावाखाली अनेकांची दुकानदारी सध्या भलतीच तेजीत आहे. अनेक किर्तनकारांचे दर, त्यांच्या सुपा-या या गोष्टी न बोलल्याच ब-या आहेत. पाच हजारापासून ते एक लाखापर्यंत एकेकाचे दर आहेत. ते किर्तनातून जे सांगतात ते त्यांच्या आचरणात असतेच असे नाही. आचरणाचा आणि सांगण्याचा काहीही संबंध नसतो. केवळ पाठांतर केलेले, घोकंपट्टी केलेले म्हणायचे. एकपात्री प्रयोग सादर करायचे. ज्याचा जगण्याचा आणि ज्याचा दुरान्वयेही संबंध नाही असे सांगायचे. बाकी त्या एकपात्री प्रयोगाचा बाजार तेजीत आहे. त्यांचा धंदा खुपच तेजीत आहे. त्यांच्या वरकड कमाईचे आम्हाला दुःख नाही पण संतपरंपरेचा बाजार मांडला आहे त्याची खंत वाटते. संतांनी हयातभर अशा प्रवृत्तींच्याकडून छळ सहन केला. संत तुकोबारायांच्या किर्तन परंपरेचा वारसा असणारे किर्तनकार आज हाताच्या बोटावर मोजण्या इतके उरलेत. आजही या सांप्रदायात काही लोक असे आहेत की त्यांनी सतांचा 'मुळ 'विचार जपला आहे. भागवत धर्माचा आत्मा जपला आहे. ते ख-या अर्थाने वारकरी आहेत. ज्ञानोबा-तुकोबाचे वारस आणि पाईक आहेत. पण अलिकडे या प्रातांत बाजारबुणग्यांची इतकी गर्दी झाली आहे की खरे कोण, खोटे कोण ? हे ओळखणे मुष्किल झाले आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन
साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे. आपल्या निवेदनात ते म्हणतात, अभिव्यक्ती या युट्युब चॅनेलचे प्रवक्ते रवींद्र पोखरकर यांच्यावर किर्तनकार मंडळींचा अवमान केला म्हणून गुन्हा दाखल केल्याचे समाज माध्यमातून कळते. मुळात पुरोगामी, प्रागतिक विचारांची परंपरा असलेल्या या राज्यात भक्तीमार्गात शिरलेल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध बोलणाऱ्या, त्याची सप्रमाण चिकित्सा करणाऱ्या एका विवेकी माणसावर अश्या प्रकारचा गुन्हा दाखल व्हावा हीच एक आश्चर्य वाटावी अशी घटना आहे मध्ययुगातील चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, नामदेव ते एकनाथ, तुकाराम महाराज आणि आधुनिक काळातील समाजसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी ही आपली वास्तविक संत परंपरा आहे. मुळात ही धार्मिक चिकित्सा करणारी, धर्मातील न्यून दाखवणारी परंपरा आहे. मानवाचा खरा धर्म कोणता आहे हे सांगणारी परंपरा आहे. या संतांना देखील त्यांच्या समकालीन सनातनी लोकांनी छळले होते, अनेकांचा बळी देखील घेतला होता हे इथला इतिहास सांगतो. नवसे सायासे पुत्र होती, मग का करावा लागे पती ? असा प्रश्न विचारणारा महासंत जगतगुरु तुकोबा या परंपरेचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. त्यांना प्रमाण मानून कोणी आधुनिक विचारक आजच्या दांभिकतेविरुद्ध बोलत असेल तर तो गुन्हा ठरतो का? जो कोणी अश्या चिकीत्सकाविरुद्ध तक्रार दाखल करत असेल, आणि ज्यांनी fir नोंदवला ते किती सुज्ञ आहेत याचाही शोध घ्यायला हवा. प्रशासन हे विवेकाच्या बाजूने असते की अविवेकाच्या याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. राज्याचे राजकीय प्रमुख म्हणून आपले ते काम आहे असे आम्ही समजतो. आजघडीला गावोगाव शेकडो कीर्तनकार कीर्तनाच्या नावाखाली सामान्य जनतेला लुटत आहेत. स्वर्ग नरकाच्या भ्रामक कल्पना मांडून जनतेला अंधश्रध्द बनवत आहेत, हा लोकशाही, विज्ञानवादी विचारांच्या पार्श्वभूमीवर गुन्हा ठरत नाही काय? केवळ टाळ हाती घेतले, अष्टगंध लावला म्हणजे कोणी साधू संत होत नसतो. समाजातील विवेक संपवणारे असे शेकडो बोगस हभप आज राज्यात सगळीकडे पसरले आहेत. मुळात त्यांना प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांना पाबंद घालणे हे प्रशासनाचे घटनात्मक कर्तव्य असताना, त्या विरुद्ध जे कोणी बोलत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे ही अतिशय गंभीर आणि राज्याला अधोगतिकडे नेणारी बाब आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. राज्यात शेतकरी आत्महत्या, कुपोषण, प्रशासकीय पातळीवरील अनाचार हे अतिशय गंभीर प्रश्न आहेत. त्याबद्दल जागृती करण्याचे काम जे करतात ते खरे संत मानावे लागतील. भेदाभेद भ्रम अमंगळ, ही खरी लोकशाही धारणा आहे, जी या संत परंपरेने आपल्याला फार त्रास सोसून दिलेली आहे. तिला भ्रष्ट करणारे कथित हभप हा ज्ञानोबा तुकोबांच्या समाजाला लागलेला मोठा शाप आहे. खऱ्या वैष्णवांचा धर्म विसरून किर्तनासारख्या लोकपरंपरा नासवणारे हे कथित हभप आहेत. पोखरकर सातत्याने त्याविरुद्ध समाज माध्यमातून बोलत आले आहेत. त्यांचे राजकीय विचार काय आहेत, ते बाळगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना घटनेने दिले आहेत. राज्यघटनेच्या लोकशाहीवादी मुलतत्त्वांविरुद्ध जर ते बोलत असतील तर तो नक्कीच गुन्हा ठरेल. तसे काही वर्तन त्यांनी केले असेल तर त्यांच्याविरुद्ध जरूर गुन्हा दाखल करावा, त्यानुसार त्यांना शिक्षा करावी. परंतु सवंग बाजारू अध्यात्माबद्दल जर ते बोलत, लिहीत असतील तर ते समाजाचे खऱ्या अर्थाने प्रबोधन करत आहेत असेच मानावे लागेल. अध्यात्मिक परंपरेतील कुप्रवृत्तीविषयी जर ते बोलत असतील आणि त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर या मराठी मातीतल्या सगळ्याच डोळस संतावर गुन्हा दाखल करावा लागेल. तुकोबांच्या विचारात बाबासाहेब आंबेडकर यांना देखील लोकशाही दिसत होती. येवढे श्रेष्ठत्व या परंपरेत आहे. तीच परंपरा काही पोटभरू, स्वार्थी लोकांनी हायजॅक केली आहे. तिला आवर घालणे हे खरे लोकशाहीतील कर्तव्य असताना विवेकाची रुजवन करू पाहणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल होत असतील तर आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत याचा विचार करावा ही विनंती. पोखरकर यांचेवरील गैर गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा.अन्यथा मुळात समाजात फैलावत जाणारा अनाचार अधिक वाढत जाईल. मग हे लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्यकर्ते लोकांना देखील हे घातक ठरेल, लोकशाही व्यवस्थेला देखील घातक ठरेल. करिता या राज्याचे प्रतिनिधी म्हणून आपण अध्यात्माचे बाजारीकरण करणाऱ्यांना पाठीशी घालू नका विनंती. ही माझी एकट्याचीच धारणा नसून ती प्रातिनिधिक आहे. बुद्धिवादी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांची ही धारणा आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments