Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात शाळकरी विद्यार्थ्यांनी लुटला कृषी पर्यटनाचा आनंद

 लोकमंगल कृषी महाविद्यालयात शाळकरी विद्यार्थ्यांनी लुटला कृषी पर्यटनाचा आनंद




 वडाळा (कटूसत्य वृत्त):-  श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून व सोलापूर सोशल फाउंडेशन पुरस्कृत सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताह निमित्त दिनांक ३० सप्टेंबर रोजी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी कृषी पर्यटन आधारित शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार  सुभाष बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून सबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्यटन सप्ताह २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. याच धर्तीवर आयोजित शैक्षणिक सहली साठी सोलापूर स्थित बटरफ्लाय इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील इयत्ता ९ वी आणि १० वीच्या एकूण १२५ विद्यार्थ्यांनी कृषी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. ह्या शैक्षणिक सहलीच्या पहिल्या सत्रात बटरफ्लाय इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील उपस्थित सर्व शिक्षक व पदाधिकाऱ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अमोल शिंदे यांनी पर्यटन सप्ताह संकल्पना समजून सांगितली आणि शाळेतील विद्यार्थ्यांना कृषी पर्यटनाचा आनंद मनमुराद घ्यावा असे आवाहन केले. यानंतर महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी  प्रा. अजित कुरे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून लोकमंगल शैक्षणिक संकुलातील वैविध्यपूर्ण गोष्टींचे आणि कृषी महाविद्यालया अंतर्गत असणाऱ्या विद्यार्थी केंद्रित विविध प्रात्यक्षिक आधारित मॉड्युल्सचे सादरीकरण केले. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्नेहभोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली गांडूळ खत प्रकल्प, आधुनिक गोठा प्रकल्प, रेशीम उत्पादन विभाग, जैविक खते निर्मिती केंद्र, रोपवाटिका, मशरूम उत्पादन विभाग, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती विभाग आणि फळे व भाजीपाला उत्पादन प्रक्षेत्र या ठिकाणी भेट देऊन शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली. कृषी पर्यटन आधारित शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण गोष्टीचे आकलन झाले. या सहलीच्या स्तुत्य आयोजनाबाबत बटरफ्लाय इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वृंद यांनी आभार व्यक्त केले. सहलीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील शैक्षणिक सहलीच्या यशस्वी संपन्नतेसाठी महाविद्यालयातील सर्व मॉड्युल प्रमुख व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 
Reactions

Post a Comment

0 Comments