सोलापूर शहरात सापडले एमडी ड्रग्ज!
कॉलेज तरुणांना नशेत अडकविण्याचा डाव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बेगमपेठ परिसरातील नॅशनल बेकरीमागे राहणाऱ्या अमीर हामजा अखलाख दिना (वय ३०) याच्याकडे पोलिसांना २९ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले आहे. जेलरोड पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
सोलापूर शहरातील तरुणांना विशेषत: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ड्रग्ज देण्याचा डाव होता, असा पोलिसांना संशय आहे.
२८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास कर्णिक नगरातील क्रीडांगणाजवळील चिल्ड्रन पार्कच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात अमीर दिना थांबला होता. त्याच्याकडे सिल्व्हर रंगाचा इलेक्ट्रिक वजन काटा व रिकामे प्लास्टिक पाऊच होते. पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली आणि काही वेळातच पोलिस त्याठिकाणी पोचले. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एमडी ड्रग्ज व इतर साहित्य मिळून आले. त्या ड्रग्जची एकूण किंमत साधारणत: एक लाखांपर्यंत आहे. त्याच्याकडे एमडी ड्रग्ज आले कोठून, कोणाला देणार होता, या बीबांचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, दुय्यम पोलिस निरीक्षक बाबुराव बिराजदार, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार मुस्ताक नदाफ, पोलिस हवालदार वहाब शेख, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे, युवराज गायकवाड, इकरार जमादार, धनाजी बाबर व श्री. सावंत यांच्या पथकाने पार पाडली.
मोबाईल जप्त, लिंक मुंबईपर्यंत
एमडी ड्रग्जची किंमत प्रतिग्रॅम तीन हजारापर्यंत असून ते ड्रग्ज सप्लायरला मुंबईत सहजपणे उपलब्ध होते. ते गुटखा, मावा, सिगारेट व चहामध्ये टाकून घेतले जाते. एक ग्रॅम ड्रग्जमध्ये किमान १० दिवस नशा करता येते. सोलापूर शहरात तरुणांना नशेच्या विळख्यात अडकवून ग्राहक म्हणून त्यांना नियमित ड्रग्ज पुरवठा करण्याचे नियोजन करणारी टोळी सक्रीय होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याअनुषंगाने तपास करण्यासाठी पोलिसांनी अमीर दिना याचा मोबाईल जप्त केला असून ड्रग्जची लिंक मुंबईपर्यंत असल्याचे समोर आले आहे. यात सहभागी संशयितांचा शोध सुरू असून अमीरच्या मोबाईलवरून त्यांचा शोध घेतला जात आहे. ड्रग्ज कोणी मागविले होते, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0 Comments