सातबारा कोरा की सरकारच्या खोटारडेपणा तोरा?
२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी ढोल–ताशे वाजवत जाहीर केलेली कर्जमाफी आठवतेय का? शेतकऱ्यांचा संसार मोकळा होईल, सातबारा कोरा होईल अशा घोषणा आभाळाएवढ्या केल्या होत्या. पण पाच-सहा वर्ष उलटले तरी आजही अनेक शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा गंधसुद्धा मिळालेला नाही. आता तर राज्याकडे पैसेच नाहीत, म्हणून ती कर्जमाफी अमलात येऊ शकत नाही, अशी धक्कादायक कबुली समोर आली आहे.
म्हणजे जाहीर कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी दिलेला दिलासा नव्हता, तर निव्वळ राजकीय जाहीरनामा होता. आज ओल्या दुष्काळाच्या संकटाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे आणि त्यात सरकारने पुन्हा "सातबारा कोरा करू" अशी स्वप्नं दाखवली आहेत. पण २०१७ चा फज्जा बघितल्यावर हे सगळं फक्त "कोरे आश्वासन" असल्याचं स्पष्ट दिसतं.
राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर यावर सरळ बोट ठेवलं आहे – “मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस असणं हीच शेतकऱ्यांसाठी खरी आपत्ती आहे”. म्हणजे एकीकडे आभाळातून पाऊस संकट ओततोय, आणि दुसरीकडे सरकारकडून कोरड्या आश्वासनांचा पाऊस – पण दोन्हींचा परिणाम शेतकऱ्याला विनाशाचाच!
ज्यांनी २०१७ मध्ये कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा केली, तेच आज पुन्हा मोठी स्वप्नं रंगवत आहेत. मग आता तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल का पुन्हा सरकारच्या खोटारडेपणाचा तोरा होईल ते येणाऱ्या काळातच कळेल.
0 Comments