छत्रपती शिवरायांचे महिलांविषयीचे उदात्त धोरण
छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करताना एका गोष्टीची प्रकर्षाने खंत वाटते ती म्हणजे महिला संरक्षण... रोज सकाळी पेपर उघडला की महीला अत्याचाराच्या किमान दोनचार बातम्या नजरेस पडतात, का होत असावं असं ? संस्काराचा अभाव, महीलांना दिलं जाणारं कनिष्ठ स्थान, आपआपसातील लोप पावलेली आपूलकी, कायदा व्यवस्थेची कमी होत चाललेली जरब, अपूरी सुरक्षा व्यवस्था या आणि अशा अनेक अंगाने याचा विचार करावा लागेल... पण खास करुन शिवरायांच्या स्वराज्यातील महीला धोरणांचा आभ्यास केला तर याला पायबंद घालणे सोपे जाईल याची खात्री वाटते.
आपण शिवपुर्व काळाचा विचार केला तर अत्यंत भयानक व भयावह अशी परिस्थिती होती. मुगल, आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही आदी मोठी साम्राज्य होती, यांच्याकडे काम करणारे सरदार, वतनदार, इनामदार आदी मंडळी स्वतःच्या परगण्यामधे राजे म्हणून वावरत होते. एकमेकांचा प्रदेश बळकावणे, लूट करणे, अतिरेकी महसुल गोळा करणे या सातत्याने होणाऱ्या गोष्टींमुळे रयत हैराण होती पण याही पेक्षा भयंकर म्हणजे स्रीयांवर होणारे अत्याचार मन सुन्न करुन टाकणारे होते.
हे सारं संपविण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजी राजांनी स्वराज्याचा संकल्प केला. हा संकल्प पुर्ण करण्यासाठी शिवबांना संस्कारीत, प्रशिक्षित करण्यात आले. रयतेवर आणि महीलांवर होणारा अन्याय दूर करणे या प्रमुख उद्देशाने प्रेरित होउनच स्वराज्य रचनेची सुरवात झाली. आई वडीलांना श्रद्धास्थानी ठेऊन शिवबांनी आपल्या शिवकार्यास सुरवात केली.
१६४२ ला जिजाऊ माँसाहेब आणि शिवबा पुण्याला आले. बेचिराख झालेल्या पुण्यामधे सोन्याचा नांगर चालविला आणि पुण्याचं नंदनवन केले. मावळ प्रांतात डोंगर दऱ्यामधे, कडेकपाऱ्यावर जाऊन शिवबांनी रयतेची दुखः जाणून घेऊन, त्याबात जिजाऊंशी सखोल चर्चा केली आणि उपाय योजना सुरु केली हा शिवबांचा नित्यक्रम होता. रयतेच्या या दुःखामधे महिलांच्या आर्त किंकाळ्या ऐकून जिजाऊ व्याकुळ होत होत्या आणि तितक्याच संतापतही होत्या. शिवरायांनी जिजाऊंच्या वेदना आणि संताप लक्षात घेऊन प्राधान्याने महिला संरक्षणासाठी कडक धोरण अवलंबिले. गावागावात, वाड्यावस्त्यावर, पाड्यावर जाऊन तरुण मावळ्यांना ग्राम संरक्षणासाठी तयार केलं, त्यांच्यामधे एकजूट केली, त्यांना शस्त्रं दिली. महिलांच्या संरक्षणाची पुर्ण जबाबदारी दिली आणि महिला अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद केली. अत्याचार करणारा कोणीही असो मग तो स्वराज्यातील असो की शत्रू सैन्याचा असो सर्वांना नियम सारखेच. यासोबतच स्वराज्यातील सैन्याला सक्त ताकीद होती की शत्रूच्याही
स्त्रियां बरोबर बदअमंल केल्यास कठोर शिक्षा केली जाईल. फौजेतील धारकऱ्यांना स्पष्ट आदेश होते की दवडीत बायाबापड्या वर हात टाकणे या बाबी ने गैरबाका झाल्यास हात कलम केले जातील. मोहिमेवर जाताना लष्करातील लोकांनी बायको बरोबर घेऊ नये त्याच बरोबर बटकीन अथवा कलावंतीन सोबत बाळगल्यास गर्दन मारण्यात येईल असे आदेश दिलेले होते. शिवरायांच्या या कडक धोरणामुळे स्वराज्यातील सैन्यात महिलांविषयी आदर भावना निर्माण झाली. जिजाऊ माँ साहेबांनी दिलेली उदात्त आचरणाची शिकवणूक व संत तुकाराम महाराजांनी केलेल्या उपदेशाचा शिवरायांवर मोठा प्रभाव होता संत तुकाराम महाराजांच्या आचरणातला एक अभंग हे दर्शवतो "पराविया नारी आम्हा रखुमाई समान हे गेले नेमून ठायीचेयी !!
जाई वो तू माते न करीच सायास ! आम्ही विष्णुदास नाही ऐसे !!
शिवरायांचं मुख्य श्रद्धास्थान जिजाऊ माँसाहेब असल्यामुळे आणि माँ साहेबांच्या संस्कारामुळे शिवरायांनी स्वराज्य व्यवस्थेमध्ये महिलांना उच्च स्थान दिले होते, महिलांना तितकेच स्वातंत्र्यही दिले होते, वेळप्रसंगी महिलांचा सन्मान व सत्कार केल्याची अनेक उदाहरणे इतिहासात नोंद केली आहेत. हिरकणी बुरुजाचा इतिहास सर्वश्रुत आहे रायगडाच्या पायथ्याशी राहणारी हिरकणी नावाची सर्वसामान्य स्त्री दूध विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते होती एकदा दूध विक्रीसाठी गेलेल्या हिरकणीस गडावर उशीर झाला गडाचे दरवाजे बंद झाले शिवरायांच्या कडक आदेशामुळे सूर्यास्तानंतर दरवाजे उघडण्यास परवानगी नव्हती, हिरकणीचे लहान बाळ भुकेने व्याकुळ होतं त्याला दूध पाजण्यासाठी हिरकणी च्या जीवाची उलघाल होत होती, गडाचे दरवाजे उघडत नाही असं लक्षात आल्यानंतर हिरकणी एका कड्यावरून खाली उतरते अत्यंत अवघड कठीण काट्याकुट्यांनी व्यापलेला असा तो कडा हिरकणी बाळाच्या प्रेमापोटी धाडसाने उतरते बाळाला दूध पाजल्यानंतर ती निश्चिंत होऊन झोपी जाते. सकाळी शिवरायांना ही बातमी कळते तेव्हा तिला दरबारात बोलावलं जातं. हिरकणी मनातून खूप घाबरते, शिक्षा होणार या भीतीने गडावर जाते पण तिचं शौर्य बाळा पोटी असणारी माया आणि प्रसंगानुरूप घेतलेला निर्णय याचं कौतुक करून शिवरायांनी तिला साडी चोळीचा मान दिला आणि अशा धाडसी माता आमच्या स्वराज्यात आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो असं मनापासून कौतुक केलं. एवढेच न करता जिथून हिरकणी खाली उतरली त्या कड्यावर मोठा बुरुज बांधून त्या बुरुजाला हिरकणीच नाव दिलं. स्त्रियांबद्दल असणारा हा आदरभाव शिवरायांच्या अनेक निर्णयातून दिसतो.
जेंव्हा शिवराय नुकतेच मावळ प्रांतात स्थिरस्थावर होत होते त्याच वेळी रांझ्याच्या गुजर पाटलाने एका मुलीवर अत्याचार केला. त्या गरीब मुलीने आत्महत्या करून आपला जीव दिला, ही बातमी शिवरायांना समजल्या समजल्या त्या गुजर पाटलास अटक करून गडावर पाचारण केले आणि त्याच्या गुन्ह्याची शहनिशा करून त्याला चौरंग्या बनवण्याची शिक्षा दिली चौरंग्या याचा अर्थ दोन्ही हात व दोन्ही पाय कलम करून कलम करणे. या शिक्षेमुळे पुन्हा कोणीही असा अपराध करू नये ही जरब लोकांमध्ये बसली.
असाच आणखी एक प्रसंग आहे वसई पासून राजापूर पर्यंतचा सागरी किनारा शिवाजी राजांच्या ताब्यात आला परंतु पनवेल जवळ प्रबळगड हा आदिलशहाचा किल्ला अजून ताब्यात आला नव्हता म्हणून राजांनी आदेश दिले की हा किल्ला सर करावा. तिथे केसरी सिंह नावाचा किल्लेदार निकराची झुंज देत होता अखेर या लढाईत तो मारला गेला, तिथे सोन्यासह विपुल असा गुप्तधनाचा शोध लागला परंतू त्याच वेळेस शिवरायांना समजले की केसरीसिंहाची आई व दोन मुले घाबरून लपून बसले आहेत, शिवरायांनी त्यांना बोलावून घेतले त्यांना पालखीचा मान दिला व संपूर्ण संरक्षणासह त्यांच्या देऊळगाव या मूळ गावी पाठवले, अशाच प्रकारे सोळाशे अष्टयात्तर साली स्वराज्याच्या सेनापतीने नेवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला होता. या किल्ल्याची किल्लेदार सावित्रीबाई देसाई ही स्त्री होती या बहादूर स्त्रीने सलग सत्तावीस दिवस किल्ला लढवला पण शेवटी आपल्या सेनापतींनी किल्ला जिंकला आणि विजयी उन्मादाने उन्मत होऊन सूड भावनेने सावित्रीबाईंवर अत्याचार केला. शिवाजी महाराजांना ही बातमी समजली तेंव्हा ते संतापले आणि सदर सेनापतीचे डोळे काढण्यात यावे असे फर्मान काढले व जन्मभर त्याला तुरुंगवासाची शिक्षा दिली, याच पद्धतीने मोगल सरदार उदाराम राजे देशमुख यांच्या विधवा पत्नी रायबागीण अटकेत सापडल्यानंतर त्यांनाही वस्त्रे जवाहर देऊन सन्मानाने औरंगाबादला सुरक्षित पोहोचविले. कर्नाटक मोहिमेच्या वेळी बेलवडीच्या राणी मल्लंमा सोबत गैरवर्तन केल्याबद्दल फौजेतील अधिकाऱ्यास कठोर शिक्षा केली, मल्लंमा राणीस स्वतःच्या बहिणीसमान वागणुक दिली व तिची गढी पुन्हा त्यांच्या स्वाधीन केली. अशा अनेक घटना शिवरायांच्या जीवनात घडल्या. स्वराज्याबरोबरच परकीय राज्यातही शिवरायांच्या स्त्री विषयीच्या उदार नैतिक धोरणाची चर्चा होती. शिवरायांचा कट्टर शत्रू औरंगजेब याने राजांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्त्री याविषयीच्या उदार धोरणाविषयी गौरवोद्गार काढले आहेत "आपल्या हातात पडलेल्या शत्रूच्या स्त्रियांच्या अब्रुची कदर करणारा एक महावीर मरण पावला." शिवरायांनी कुटुंबातील सर्वच महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतले होते जिजाऊंचे मार्गदर्शन , आठ राण्यांचे सल्ले तर सुनबाईचा सहभाग या सर्व बाबी शिवरायांचा स्त्रियांबाबत असणारा उदात्त दृष्टिकोन दर्शवतात. संभाजी राजांच्या पत्नी येसू राणीसाहेब यांना "सखी राणी जयती" असा शिक्का मोर्तब बहाल केला व स्वराज्याच्या कुळमुखत्यार म्हणून त्यांना अधिकार दिले. शिवरायांनी स्वतःच्या मुलींना सुद्धा स्वराज्य सेवेत सामावून घेतले होते, वैदिक धर्माने शूद्र ठेवलेल्या स्त्रियांना शिवरायांनी सन्मानाची व नैतिकतेची वागणूक दिली.माँसाहेब जिजाऊ यांच्या संस्कारातून शिवरायांची जडणघडण झाली असल्याने स्वराज्य स्थापन करत असतानाच शिवरायांनी आपल्या सैन्याला सांगितलं होतं कि "ज्याला यश पाहिजे त्याने स्त्री अभिलाषा धरू नये स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे या देवतेचा आपण आदर केला पाहिजे" हीच शिवरायांची भूमिका मावळ्यांच्या आणि रयतेच्या मनामनात रुजली होती, दृढ झाली होती म्हणून शिव काळामध्ये महिलेवर अत्याचार या घटना घडण्याचे बंद झाले. महीला भयमुक्त झाल्या. शिवरायांचे कायदेकानून आणि निर्णयाची जरब केवळ स्वराज्यातील रयते पुरती मर्यादित नव्हती तर परकीय राज्यांमध्ये, शत्रुसैन्यामधेसुद्धा मोठ्या प्रमाणात होती आणि म्हणूनच त्याकाळात कदाचित स्त्रियांना आरक्षण नव्हते पण 100% संरक्षण होते.
आजच्या पिढीने शिवजन्मोत्सव साजरा करत असताना आपल्या घरातील परिसरातील गावातील शहरातील पर्यायाने देशातील स्त्रियांचा आदर सन्मान यासह संरक्षण करण्याची शपथ घेतली पाहिजे तर खऱ्या अर्थाने शिव विचार आम्हा सर्वांच्या मनात रुजला असे म्हणता येईल. आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेवर मात करण्यासाठी समाज, सरकार, न्यायव्यवस्था, प्रसार-प्रचार माध्यम व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आदी माध्यमांनी ठोस भूमिका घेऊन देशांतर्गत असणाऱ्या या अपप्रवृत्तींचा नायनाट करणे अत्यंतिक गरजेचे आहे म्हणून घराघरात शिवचरित्राचे वाचन पारायण होणे अवश्यक आहे. बालसंस्कार, शालेय संस्कार, समाज संस्कार यामध्ये शिवचरित्राचा मोठ्या प्रमाणात सामावेश करावा लागेल.
आज साजऱ्या होणाऱ्या शिव जन्मोत्सवानिमित्त तमाम देशवासियांना शिवभक्तांना जिजाऊ भक्तांना लाख लाख सदिच्छा धन्यवाद !
प्रशांत पाटील
विभागीय अध्यक्ष
मराठा सेवा संघ सोलापूर
.jpg)
0 Comments