दोन देशमुख एकत्र येईनात, प्रणिती शिंदे, विजयकुमार देशमुखांची डीपीसी बैठकीला दांडी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील मतभेद आणि वाद नवा नाही. विशेषतः शहरातील दोन देशमुखांमधील वाद संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रूत आहे. तो वाद अगदी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचला आहे.
तेच चित्र पालकमंत्र्यांच्या पहिल्या दौऱ्यात आणि जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत दिसून आला. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या पहिल्याच दौऱ्याला माजी सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी दांडी मारली होती, तर डीपीसीच्या बैठकीला माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुखांची अनुपस्थिती होती, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या स्वागताला दोन्ही देशमुखांची एकत्र एन्ट्री आतापर्यंत होऊ शकलेली नाही.
सोलापुरातून मंत्रिपदासाठी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख इच्छूक होते. तसेच, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचेही नाव चर्चेत आघाडीवर होते. सोलापूर भाजपमध्ये दोन देशमुख हे सिनिअर नेते आहेत, त्यामुळे मंत्रिपदासाठी ते तीव्र इच्छूक होते. मात्र, मागील पंचवार्षिकप्रमाणेच याही वेळी सोलापूरला मंत्रिपद मिळू शकलेले नाही.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. ३० जानेवारी) सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील (ऑनलाईनद्वारे), आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार दिलीप सोपल, आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार देवेंद्र कोठे हे उपस्थित होते. मात्र, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुखांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
पालकमंत्री गोरे यांच्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीसाठी विजयकुमार देशमुख उपस्थित होते. गोरे यांचे स्वागत करून ते परत निघाले होते. मात्र, गोरेंनी आग्रह करून देशमुखांना बैठकीसाठी नेले हेाते. त्या दौऱ्यात माजी मंत्री सुभाष देशमुखांची अनुपस्थिती होती. त्यामुळे दोन्ही देशमुखांच्या टायमिंग साधण्याच्या प्रकाराची जोरदार चर्चा सोलापूरमध्ये रंगली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून डीपीसीची बैठक महत्वाची मानली जाते. मात्र, सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या बैठकीला अनुपस्थित होते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे प्रत्यक्ष हजर राहण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीने बैठकीला हजेरी लावली होती. गोरे यांच्या नियुक्तीवरून सोलापूरच्या राजकारणात वेगळीच चर्चा रंगली आहे, त्यामुळे मोहिते पाटलांनी प्रत्यक्ष बैठकीला येणे टाळले का, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
0 Comments