अश्विनी सहकारी रुग्णालय येथे नवीन एमआरआय व नूतनीकरण केलेले
जीई-आयसीयुचे चेअरमन बिपीनभाई पटेल
यांच्या हस्ते उद्घाटन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-1.5 टी एमआरआयचे व नूतनीकरण केलेल्या ग्रॅस्ट्रोएंटरोलॉजी आयसीयु (जीई-आयसीयु) चे उद्घाटन चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवर सोलापूर शहर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणपशेट्टी आणि रुग्णालयाचे संचालक मंडळ सदस्य, तज्ञ डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
1982 मध्ये अश्विनीची स्थापना झाल्यापासून आजतागायत ती वृध्दिंगत होत आहे. सोलापूरच्या भौगोलिक रचनेमुळे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील 6 जिल्ह्यातून – विजयपूर, कलबुर्गी, रायचूर, बिदर, लातूर, उस्मानाबाद येथील रुग्ण मोठ्या प्रमाणात सोलापूरच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेतात. येथील डॉक्टर्स विशेषत: तज्ञ डॉक्टर्स निष्णात तर आहेतच परंतु अखंड परिश्रम आणि इमर्जन्सी सेवा देण्यात 24 तास अहोरात्र तत्पर असतात. त्याचा फार मोठा दिलासा रुग्ण आणि नातेवाईकांना होत आहे. गेल्या चार दशकापासून अव्याहतपणे हे चालू आहे. अहर्निश रुग्णांचा लोंढा सोलापूरकडे येत आहे. हे येथील डॉक्टर समूहाच्या विश्वासार्हतेचे फलित आहे. समस्त डॉक्टर्स आणि सहकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन !
सोलापूर व नजीकच्या परिसरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माफक दरामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यामध्ये अश्विनी सहकारी रुग्णालय हे कायम अग्रेसर आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये होणारे बदल अंगीकृत करुन सोलापूरकरांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यामध्ये अश्विनी व त्यांचे संचालक मंडळ कायम प्रयत्नशील असते.
त्याचाच एक भाग म्हणून नवीन 1.5 टी एमआरआय प्रस्थापित करण्यात आले आहे. या सिमेन्स कंपनीच्या एमआरआय चे वैशिष्ट्य कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर [A.I.] व कार्डियाक इमेजिंग हा आहे. या नवीन एमआरआय मशिनचा उपयोग मेंदू, सांधे, मणके इत्यादींच्या रुग्णांची तपासणी करुन, त्यांचे अचूक निदान करण्यात येते. कार्डियाक इमेजिंगमध्ये प्रमुखत: कार्डियाक व्हायबिलिटी टेस्ट, कार्डियाक फंक्शनल टेस्ट, इत्यादी समाविष्ट आहेत. याचा फायदा रुग्णांना निश्चितच होईल.
बिपीनभाई पटेल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि त्यांना सक्रीय सेवाभावी संचालकांची मिळालेली मोलाची समर्थ साथ यामुळे आणि 110 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टरांच्या अथक परिश्रमांच्या साथीने, कार्यतत्पर आधिकारी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक टीमवर्कमुळे रुग्णालयात एकाच छताखाली वैद्यकीय क्षैत्रातील जवळजवळ सर्व सेवा 300 बेडस्च्या या रुगणालयात 24 तास अहोरात्र रुग्णांसाठी मिळत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना तर हे रुग्णालय एक वरदानच आहे.
NABH च्या मार्गदर्शकचे तत्त्वानुसार रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ग्रॅस्ट्रोएंटरोलॉजी आयसीयु (जीई-आयसीयु) नूतनीकरण करण्यात आले आहे. या आयसीयु मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, सेंट्रल एअरकंडीशनिंग, सेंट्रल ऑक्सिजन, मॉनिटर्स, व्हेंटीलेटर्स इत्यादी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. या आयसीयुचे कामकाज डॉ.सुजीत जहागीरदार व डॉ.विनित वाकडे हे पाहणार आहेत.
कोविड 19 जागतिक महामारीमध्ये रुग्णसेवेत अश्विनीने केलेली रुग्णसेवा ही शब्दातीत आहे. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधक लस टोचणी केंद्र म्हणून गौरवास्पद कार्य अश्विनीने केले आहे आणि करीत आहे.
बिपीनभाईंनी आणि सहकाऱ्यांनी रुग्णालयामध्ये क्रांतीकारी परिवर्तन यशस्वीपणे आणले असून, पुणे, मुंबई, हैदराबाद येथील दर्जाच्या सेवा योग्य दरामध्ये त्यांनी अश्विनीमध्ये उपलब्ध करुन दिल्या आहेत.अश्विनीच्या वैद्यकीय सेवेचा वारसा अखंड असेच पुढेही चालू राहणार आहेत. याचे कारण येथील पायाभूत सुविधा आणि अविश्रांत कार्यरत असणारे डॉक्टर्स आणि त्यांचे सर्व सहकारी हे आहेत.
या पत्रकार परिषदेस संचालक सर्वश्री डॉ.विजय पाटील, चंद्रशेखर स्वामी, भैरुलाल कोठारी, मेहूल पटेल, अशोक लांबतुरे, डॉ. राजीव प्रधान, विलास पाटील व श्रीमती यशोदाबाई डागा, सौ.इंदुमती अलगोंड आणि डॉक्टर्स – डॉ. सिध्देश्वर रुद्राक्षी, डॉ.गुरुनाथ परळे, डॉ.अनुपम शहा, डॉ.श्रीराम अय्यर, डॉ. विरुपाक्ष जोशी, डॉ.विद्यानंद चव्हाण, डॉ.सुजीत जहागीरदार, डॉ. विनित वाकडे, डॉ.मिलिंद जोशी, डॉ.अशोक आपटे, डॉ.अमोल पाटील आणि बहुसंख्य अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
0 Comments