जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाकडून आझाद मैदानाची पाहणी
29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येणार : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य विविध मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला पाहायला मिळत असून, ऐन गणपतीच्या दिवसात म्हणजे 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व स्वतः मनोज जरांगे पाटील करणार असून, जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईत येणार असल्याची माहिती आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाने दिली आहे. आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजीचा मोर्चा महत्त्वाचा असून, सरकारवर दबाव आणण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असल्याचे आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.
मुंबईत विविध मैदानाची केली पाहणी : या संदर्भात माहिती देताना शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की, "मराठा समाजाचे आरक्षण आणि अन्य मागण्यासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईत जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होणार आहे. या उपोषणात मोठ्या संख्येने मराठा समाज सामील होणार असून, त्या निमित्ताने आम्ही मुंबईत विविध मैदानाची पाहणी करीत आहोत. यात आझाद मैदान, वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मैदान आणि दादर येथील शिवाजी पार्क अशा तीन मैदानांची आम्ही पाहणी करणार आहोत. या पाहणीनंतर आम्ही घेतलेली सर्व माहिती आम्ही जरांगे पाटील यांना सांगू. त्यानंतर उपोषणाच्या नियोजनाबाबत स्वतः जरांगे पाटील घोषणा करतील. आमचं अंतरवाली सराटी येथील शिष्टमंडळ आणि मुंबईतील आमचे मराठा समाजाचे पदाधिकारी आम्ही एकत्रित सर्व पाहणी करत आहोत," अशी माहिती मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने दिली आहे.
तोपर्यंत आंदोलन मुंबईतून मागे फिरणार नाही : तर दुसरीकडे 29 ऑगस्ट रोजीच्या उपोषणाबाबत जरांगे पाटील यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधला असून, यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना इशारा दिला आहे. "जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षण आणि अन्य मागण्या सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत मराठा समाजाचे 29 ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन मुंबईतून मागे फिरणार नाही. तुम्ही मराठा समाजाच्या वाट्याला जाऊ नका. आता अभ्यास वगैरे झालं. आता आमच्या मागण्यांची थेट सरकारकडून अंमलबजावणी झाली पाहिजे," अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.
0 Comments