'सहा महिने रास्त धान्य घेतले नाही तर लाभ बंद'
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सलग सहा महिने रेशनधान्य दुकानातून धान्य न घेणाऱ्या रेशनकार्डधारक कुटुंबांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना अशा रेशनकार्डधारकांची यादी पाठविली जात आहे.
सोलापूर शहरातील साडेतीन हजार रेशनकार्डधारकांनी सलग सहा महिने धान्य घेतलेले नव्हते. त्यांची यादी सहा महिन्यांपूर्वी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना आली होती. त्यानुसार ते रेशनकार्ड 'सायलेन्ट' समजून त्या रेशनकार्डधारकांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांचा धान्य देण्याचा लाभ बंद करण्यात आला आहे. याशिवाय आता आणखी १६०० रेशनकार्डधारकांची यादी शासनाकडून पाठविण्यात आली असून त्यांचाही लाभ बंद झाला आहे.
असे रेशनकार्डधारक 'एनपीएस' (बिगरप्राधान्य कुटुंब लाभार्थी) योजनेत वर्ग केले जातात. दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे नऊ ते दहा हजार रेशनकार्डधारकांचा लाभ या निकषांनुसार बंद झाला आहे. सलग सहा महिने धान्य न घेतलेल्यांना रेशन दुकानातील धान्याची गरज नाही, असे समजून त्यांचा धान्याचा हक्क पुढे बंद होतो, असा हा नियम आहे.
काय आहे नियम
केंद्र सरकारने २२ जुलै रोजी लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश अधिसूचित केला आहे. त्यानुसार सहा महिने रेशनचे धान्य न घेणाऱ्यांचे रेशनकार्ड ॲक्टिव्ह राहत नाही. त्यानंतर तीन महिन्यांत ते लाभार्थी त्याच पत्त्यावर राहायला आहेत का?, त्यांनी स्थलांतर केले आहे का?, त्यांना धान्याची गरज नाही का?, त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे का?, अशा बाबींची पडताळणी केली जाते. त्यानंतर संबंधित शिधापत्रिकाधारकांचा लाभ बंद केला जातो, असा हा नियम आहे.
चौकट
प्राधान्यक्रम कुटुंबातील रेशनकार्डधारकांना शासनाकडून स्वस्तात दरमहा धान्य दिले जाते. पण, सलग सहा महिने धान्य न उचलणाऱ्या रेशनकार्डधारक कुटुंबास स्वस्तातील धान्याची गरज नाही असे समजले जाते. अशा रेशनकार्डधारकांची यादी शासनाकडून प्रत्येक सहा महिन्याला पाठविली जात आहे. त्यानुसार संबंधितांची पडताळणी करून त्यांचा लाभ बंद केला जात आहे.
- ओंकार पडुळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर
0 Comments