मुंबईपाठोपाठ तिरुपतीसाठीही सोलापूरहून विमानसेवा - जयकुमार गोरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर-गोवा विमानसेवा यशस्वीपणे सुरू असल्याचा दावा करीत, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, येत्या ऑगस्टमध्ये मुंबई आणि त्या पाठोपाठ तिरुपतीची विमानसेवाही सुरू होणार असल्याचे सांगितले.
भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात १४ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते केला. त्या वेळी ते बोलत होते. कर्णिकनगरात हा कार्यक्रम आयोजिला होता. या वेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी महापौर किशोर देशपांडे आदी उपस्थित होते.
सोलापूरच्या विमानसेवेचा तिढा लवकरच सुटणार असून, विशेषतः मुंबईत सोलापूरच्या विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई विमानसेवा सुरू होऊन पर्यायाने सोलापूरच्या औद्योगिक, व्यापार, शिक्षण आदी क्षेत्राचा भरीव विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील विविध समस्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी केलेला पाठपुरावा केल्यानंतर आता शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी बदलण्यासाठी ८५० कोटी रुपये खर्चाची योजनाही मंजूर झाली आहे. तसेच अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात खराब रस्त्यांच्या विकासासाठी ५५ कोटी रुपये खर्च करून तेथील समस्या सोडविण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा सुरू होत असल्याचे गोरे यांनी सांगितले.
0 Comments