साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकांना रात्री बारा वाजेपर्यंतचा मिळणार परवाना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात दरवर्षी १ ऑगस्टपासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. सन १९९४ पासून सुरू झालेला हा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक प्रबोधनाचा उपक्रम मागील ३० वर्षांपासून समाजात भरीव योगदान देत आहे.
या उत्सवाची सांगता दरवर्षी रविवारी भव्य मिरवणुकीच्या संचलनाने केली जाते. यावर्षी रविवार ३ ऑगस्ट रोजी भव्य मिरवणुकीने जयंती उत्सवाची सांगता होणार आहे. यामध्ये ६० जयंती उत्सव मंडळे आकर्षक देखाव्यांसह सहभागी होणार आहेत . पोलीस प्रशासनाकडून दरवर्षी मिरवणुकीसाठी रात्री १०:०० वाजेपर्यंतच परवानगी दिली जात होता. त्यामुळे वेळेअभावी अनेक मंडळांना मिरवणूक अपूर्ण ठेवावी लागत होती. त्यामुळे त्यांनी उभा केलेले समाज प्रबोधनात्मक देखावे लोकांना पाहणे शक्य होत नव्हते.
सकल मातंग समाज,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, सोलापूर यांच्या वतीने तसेच मातंग समाजाच्या विविध संघटना,राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे परवाना रात्री १२:०० वाजेपर्यंत वाढवून मिळवण्यासाठी निवेदने दिली होती. या सर्वांची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या २८ जुलै च्या दौऱ्यात मिरवणूक परवाना बारा वाजेपर्यंत वाढवून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीचा परवाना बारा वाजेपर्यंत वाढवून द्यावा अशी मागणी केली. ही मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तत्काळ मान्य करत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि शहराचे पोलीस आयुक्त यांना मिरवणूक परवानगी रात्री बारापर्यंत वाढवून देण्यासंदर्भातील आदेश दिले. या निर्णयामुळे पालकमंत्र्याचे सर्वांनी अभिनंदन केले.
यावेळी सुरेश पाटोळे, गोविंद कांबळे, शांतीलाल साबळे, मिथुन लोखंडे, अभिषेक हटकर, आदित्य शिंदे, बंडू गवळी, सतीश बगाडे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments