Hot Posts

6/recent/ticker-posts

शहरात जीबीएस रुग्णांची शोध मोहीम: ४५० आशा वर्कर घेणार शोध; नव्या रुग्णांची नोंद नाही

 शहरात जीबीएस रुग्णांची शोध मोहीम: 

४५० आशा वर्कर घेणार शोध; नव्या रुग्णांची नोंद नाही


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात जीबीएस रुग्णांचा शोध घेण्यासाठी आशा वर्करकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. शहरात जीबीएसची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय झाला आहे.

मागील चोवीस तासात एकाही नव्या रुग्णांची नोंद झाली नाही.

जीबीएसच्या संदर्भात आज महापालिकेच्या आरोग्य खात्याने बैठक बोलावली होती. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. किरण सारडा यांच्यासह न्यूरोलॉजिस्ट डॉ. वळसंगकर, डॉ. आशिष भुतडा यांच्यासह निमाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जीबीएसचे निदान डॉक्टरांकडून लवकरात लवकर व्हावे, जेणे करून या रुग्णांची नोंद करून त्यांना अधिक चांगले उपचार देण्याचा प्रयत्न करता येणार आहे. खासगी दवाखान्यात या प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर तेथेच उपचार न करता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात यावे.

कारण या आजारावरील उपचाराचा खर्च मोठा आहे. शासकीय रुग्णालयात हा उपचार मोफत मिळतो आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये जीबीएसची लक्षणे आढळली तर लगेचच कळवले जावे. सध्या तरी या आजारात पाणी उकळून पिणे, हात नियमित धुणे व घरचे ताजे अन्न खाणे या गोष्टी पाळल्या जाव्यात, हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. पुणे येथे जीबीएस रुग्णांची वाढलेली संख्या ज्या भागात होती तेथील पाणी दूषित होते असा अहवाल आल्याने या मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

आम्ही शहरात जीबीएसच्या रुग्णांची शोध मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. कारण हा आजार संसर्गजन्य नाही. उपचाराचा खर्च महागडा असल्याने शासकीय रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध आहेत.

- डॉ. राखी माने, आरोग्य अधिकारी, महापालिका, सोलापूर

या कालावधीत आढळतात रुग्ण

यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे डिसेंबर- फेब्रुवारी व मे महिन्यात या रुग्णांची संख्या आढळते. या कालवधीत सर्दी, तापीचे रुग्ण वाढले की त्यातील काही जणांना जीबीएसची लक्षणे दिसू शकतात.

Reactions

Post a Comment

0 Comments