श्री सिध्देश्वर २१ डिसेंबर पासून कृषी प्रदर्शनास पारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी ५३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास अत्यंत उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळत असून यंदाच्या ५४ व्या वर्षी हे प्रदर्शन येत्या २१ ते २५ डिसेंबरपर्यंत भरणार असल्याची माहिती श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.सोमवारी श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यस्तरीय कृषी व औद्योगिक प्रदर्शनाची काडादी यांनी सविस्तर माहिती दिली. सोलापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी आणण्यासाठी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी ५३ वर्षांपूर्वी कृषी प्रदर्शनास प्रारंभ केला. यंदाचे हे ५४ वे वर्ष आहे. कालसुसंगत तंत्रज्ञानाची कास धरत हे प्रदर्शन आता मोठ्या प्रमाणात भरत आहे. कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांसह आता औद्योगिक उत्पादनांचाही या प्रदर्शनात सहभाग राहणार आहे. म्हणूनच दरवर्षी होणाऱ्या श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात या वर्षापासून श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन असा बदल करण्यात आल्याचे काडादी यांनी सांगितले. या प्रदर्शनामध्ये शरद ठाकरे आणि कोठारी यांच्यासारख्या सोलापूरच्या उद्योजकांचा सहभाग राहणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांसाठी काही स्टॉल्स राखीव असून मराठवाड्यासह तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहनही काडादी यांनी केले.तमिळनाडू, वेल्लोर, सेलम तसेच महाराष्ट्रातील सोलापूर,नाशिक, पुणे येथील संस्थांकडील शेतकऱ्यांनी स्वतःतयार केलेले सुमारे ५०० प्रकारचे दुर्मीळ देशी बी-बियाणे प्रदर्शनात मांडले जाणार आहेत.तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनअंतर्गत भरविण्यात येत आहे. कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर व मोहोळ विभाग, रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयीकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय,कृषी स्टार्टअप उद्योजक, नव उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण,फळ रोपवाटिका धारक, साखर कारखाने यांचाही सहभाग असणार आहे. या पत्रकार परिषदेस स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे, रतन रिक्के, विलास कारभारी, अॅड. आर. एस.पाटील, मल्लिकार्जुन कळके यांच्यासह पंचकमिटीचे विश्वस्त उपस्थित होते.
चौकट 1
शासनाच्या कृषी आणि अन्य योजनांची माहिती : माळगे
श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शन भरवत
असून या प्रदर्शनात ३०० दालनांची नोंदणी झाली आहे. शासनाच्या कृषी आणि अन्य योजनांची
माहिती या प्रदर्शनात होणार आहे. रविवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत डॉग शो
तर दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत कॅट शो प्रदर्शन होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके
देण्यात येणार आहेत. या शिवाय सायंकाळी ६ वाजता डॉग आणि कॅट फॅन्सी ड्रेस स्पर्धाही होणार
असल्याचे कृषी व औद्योगिक प्रदर्शन समितीचे चेअरमन गुरुराज माळगे यांनी सांगितले. सोमवार, २३
डिसेंबर रोजी राज्यस्तरीय देशी गाय, बैल प्रदर्शन स्पर्धा आयोजन व विजेत्यांना पारितोषिके देण्यात
येणार आहेत. शिवाय पुष्प प्रदर्शनही (फुलांचे प्रदर्शन) आयोजित केल्याचे माळगे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यामधील कृषी व संलग्न, गारमेंट, टेक्स्टाइल, टॉवेल इत्यादी उत्पादित मालाचे प्रदर्शनात
सहभाग असणार आहे.
चौकट 2
शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यास मदत : बरबडे
गारमेंट तसेच टेक्स्टाइल विभागाची दालने, भारतातील विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स व शेती अवजारे,
शेतीविषयक प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेतीचे विशेष दालन, ५०० हून दुर्मीळ देशी बियाण्यांचे प्रदर्शन
व विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती, कृषी
यांत्रिकीकरण, दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमक्षिका पालन, फलोत्पादन तसेच कृषी उद्योजक
निविष्ठा, नवीन स्टार्टअप व्हर्टिकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे इत्यादींविषयी सविस्तर माहिती
पोहोचण्यास सुलभ होईल, असा विश्वास 'आत्मा' चे निवृत्त उपसंचालक विजयकुमार बरबडे यांनी
सांगितले. या कृषी प्रदर्शनामध्ये सोलापूरचे शान असलेली खिलार बैल व गाय प्रदर्शित केले जाणार
आहेत. तसेच जगातील अत्यंत दुर्मीळ बुटकी देशी पुंगनूर जातीचे गायी प्रदर्शित केले जाणार असल्याचे
बरबडे यांनी सांगितले.
चौकट 3
सर्वात बुटकी गाय आणि म्हैस
विविध जातीच्या श्वानांचे प्रदर्शन (डॉग शो), विविध जातीच्या
मांजरांचे प्रदर्शन (कॅट शो), जगातील सर्वात बुटकी गाय आणि
म्हैस यांच्यासह चीनचा बोकड आणि तब्बल सहा किलोचा कोंबडा
यांचा सहभाग यंदाच्या कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे आकर्षण
ठरणार आहे.
0 Comments