!! महापरिनिर्वाण दिनानिमित्त !!
!! आदरांजली !!
6 डिसेंबरला परमपूज्य आदरणीय महामानव, बोधिसत्व,विश्वरत्न,भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे माहापरीनिर्वाण झाले. आज त्याला 68 वर्षे झाली. जगभर निरव शांतता पसरली.मानवतेच्या महामानवाने चिरशांती घेतली. बाबासाहेब आज शरीराने आमच्यामध्ये नाहीत.याची जाणीवही होत नाही. बाबासाहेबाचे असण्याचे अस्तित्व ह्रदयात आहे.बाबासाहेब शरीराने या जगात दिसत नसले तरी विचाराने संपूर्ण जगामध्ये आजही अस्तित्वात आहेत. इतकेच नाही तर जगाने बाबासाहेबांचे विचार, अचार, विचारांमध्ये,कृती मध्ये स्वीकारलेले आहेत, आणि विचारावर,तत्वज्ञानावरच नवीन जगाची मांडणी होत आहे, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होती,ती समाजव्यवस्थेची पुनर्बांधणी की, जी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या वर आधारलेली, ज्या व्यवस्थेमध्ये माणूस आणि मानवता केंद्रीभूत असेल व सर्व व्यवहार माणूस केद्रिंत असतील, असमानता, विषमता, भेदभाव, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय यामध्ये समानता असेल आणि माणूस म्हणून त्याचे अस्तित्व मान्य करणारी असेल, आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व निधर्मी, निस्वार्थ आणि समानतेच्या तत्त्वावर आधारलेली समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे.असे वाटते,
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतर 68 वर्षाचा काळ लोटलेला आहे, या काळामध्ये जगामध्ये मोठे परिवर्तन झाले आहे, सर्व क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे, नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती झालेली आहे, नवीन शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय बदल झालेले आहेत, हे बदल जगाने स्वीकारले आहेत, या परिवर्तनशील जगामध्ये नवीन विचाराची,धोरणांची, योजनांची, नीतिमत्तेची नव्याने भर पडलेली आहे, या बदलाचा चांगला, वाईट परिणाम दिसून येत आहे.
बाबासाहेबांचा काळ तसा धर्माने पूर्ण समाजाला ग्रासलेला होता. माणसाच्या मानसिकतेला, धर्माच्या नावाने पूर्णपणे गुलाम करून टाकलेला होता, ज्या व्यवस्थेमध्ये समता नव्हती आणि उच्च,नीचता, भेदभाव, अस्पृश्यता, विषमता समाजातील सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नव्हता,ज्या व्यवस्थेमध्ये माणसाची प्रगती त्याच्या जगण्याचे साधन पूर्णपणे वर्णव्यवस्थेच्या,जात व्यवस्थेच्या आधीन झाले होते, व्यवस्था श्रेष्ठ आणि कनिष्ठतेवर आधारलेली होती.आजही दिसते पण उघड दिसत नाही,अस्पृश्यता पाळणे ही कायद्याने गुन्हा आहे, बाबासाहेबांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजामध्ये समानता आणण्यासाठी सतत प्रयत्न केला, आज संविधानामुळे सर्वसामान्य माणूस हा आपले अधिकार आणि कर्तव्य बजावू शकतो, बाबासाहेबांनी माणसातला माणूस जागा करण्याचा प्रयत्न केला.
बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मंत्र दिला, त्यामुळे ज्या समाजात शिक्षण नव्हते तेथे शिक्षण आले, समाज शिक्षित झाला, शिक्षणाने समाजामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि समाज स्वाभिमानाने आपले अस्तित्व टिकून राहिला,
बाबासाहेबाचे महापरिनिर्वाण झाले आज समाजात मार्गदर्शक नाही, समाजाची वेगवेगळ्या सर्व क्षेत्रांमध्ये थोडी बहुत प्रगती झालेली दिसून येते, एकसंघ राहून समाजाची प्रगती होणे अपेक्षित आहे, परंतु ती मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही अनेक राहूट्या निर्माण झाल्या परंतु एक मोठा राजवाडा उभारणे अपेक्षित आहे, एका छताखाली सर्व समाज बांधव येणे ही काळाची गरज आहे, समाजकारणा बरोबरच शिक्षणाच्या या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली असली तरी धर्मकारण आणि राजकारणा मध्ये म्हणावी तशी प्रगती झालेली दिसत नाही,
आज या गंभीर दिवशी आपण एका नवक्रांतीची एकत्रितपणे सुरुवात करणे गरजेचे आहे.असे वाटते राजकारणामध्ये अनेक गट असले तरी आंबेडकरी विचाराने ओत प्रोत भरलेली आहेत तसेच आंबेडकरी विचाराचे अनेक विचारवंत, कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विखुरलेले आहेत, त्यांची वैचारिक ताकद खूप मोठी आणि पक्ष वाढविण्याच्या कामी महत्त्वपूर्ण आहे,असे सर्व लोक एकाच आंबेडकरी विचाराच्या झेंड्याखाली, नेतृत्वाखाली एकत्रित येऊन आपला स्वाभिमानी बाणा बळकट करावा.
हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली होईल,
जयभीम,नमोबुध्दाय।
प्रा.डाँ.अशोक गायकवाड, सोलापूर
0 Comments