मोठ्या जाहीर सभांसाठी १०, तर कॉर्नर सभांसाठी १४ मैदाने उपलब्ध करून दिली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचार सभा,कॉर्नर सभा घेण्यासाठी २४ मैदानांची यादी महापालिकेच्यावतीने जाहीर केली आहे.त्यामध्ये मोठ्या जाहीर सभांसाठी १०, तर कॉर्नर सभांसाठी १४ मैदाने उपलब्ध करून दिली आहेत.. अद्याप कोणत्याही पक्षाने एकही मैदान बुक केले नसल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.सोलापूर शहर जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीची लगबग चालू आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघार घेण्यासाठी चार नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर प्रचाराचा ज्वर चढणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही प्रभागांचा समावेश आहे. या मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून अनेक स्टार प्रचारक, सेलिब्रेटी, अभिनेत्यांच्या सभांचे नियोजन केले जात आहे. या सभांसाठी महापालिकेच्या भूमिमालमत्ता विभागाच्या वतीने २४ मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. मैदान बुक करण्यासाठी भूमिमालमत्ता विभागाच्या वतीने निवडणूक कार्यालयात 'एक खिड़की' योजना सुरू केली आहे.त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.मैदानांची मागणी केल्यानंतर रितसर पैसे भरल्यानंतर मैदान बुक केले जाते.
0 Comments