अनगर येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा महाराष्ट्र राज्य शासनाचा आदेश
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यात अनगर येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल विभागाने घेतला असून याबाबतचे लेखी प्रशासकीय आदेश दि. २४ जुलै रोजी महसूल प्रशासनाचे उपसचिव सुनील कोठेकर यांनी काढले आहेत. फेब्रुवारी महिन्यात अनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी आ.राजन पाटील, आ.यशवंत माने यांना दिलेला स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाचा शब्द पूर्ण केला असून या कार्यालयामुळे मोहोळ तहसील कार्यालयावर पडणारा अमर्याद ताण आता कमी होणार आहे.याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, मोहोळ तालुक्यात १०४ महसूली गावांचा समावेश आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार सदर तालुक्याची लोकसंख्या २,७६,९२० इतकी आहे. या तालुक्याचे वाढते शहरीकरण व यामुळे वाढलेल्या प्रशासकीय कामकाजाचा निपटारा जलदगतीने करण्याकरीता तसेच प्रशासकीय सोय आणि नागरिकांच्या सोयी व सुलभतेच्या दृष्टीने अप्पर तहसील कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक होते.
ही प्रशासकीय बाब ध्यानात घेऊन महसूल विभागाने अनगर,शेटफळ, नरखेड, पेनूर या मंडल यांकरिता स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मोहोळ तालुक्यातील तहसील कार्यालयाचे पुढे निर्देशित केल्याप्रमाणे विभाजन करुन अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय तात्काळ सुरु करण्यात यावे, असेही या आदेशात म्हटले आहे.पुणे विभागीय आयुक्त स्तरावरून अपर तहसील कार्यालयाकरीता नवीन पदे मंजूर होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून मोहोळ तहसील कार्यालयातून व पुणे विभागातून १ अपर तहसीलदार, १ नायब तहसीलदार, १ अव्वल कारकून व ४ महसूल सहायक (लिपीक-टंकलेखक) अशी एकूण ७ पदे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
.png)
No comments:
Post a Comment