सलग दुसऱ्यांदा राजन पाटील यांनी दिलेल्या संधीचे सोने करून बाळराजेंच्या आमदारकीसाठी प्रयत्न करणार - आ.यशवंत माने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 23, 2024

सलग दुसऱ्यांदा राजन पाटील यांनी दिलेल्या संधीचे सोने करून बाळराजेंच्या आमदारकीसाठी प्रयत्न करणार - आ.यशवंत माने

सलग दुसऱ्यांदा राजन पाटील यांनी दिलेल्या संधीचे सोने करून बाळराजेंच्या आमदारकीसाठी प्रयत्न करणार - आ.यशवंत माने

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मी नवखा उमेदवार असताना सुद्धा राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदार बंधू भगिनींनी मला चांगल्या मताधिक्याने मतदारसंघाचा आमदार म्हणून संधी दिली. त्या विश्वासास पात्र राहून मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष सहकार्यातून आणि राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली २२५० कोटी पर्यंतचा निधी आणून आपल्या मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.

यापुढील काळातही राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाळराजे  आणि अजिंक्यराणा या बंधुना समवेत घेऊन विकासात्मक वाटचाल अविरतपणे सुरू ठेवणार आहे अशी ग्वाही आमदार यशवंत माने यांनी अनगर येथे दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि घोषित उमेदवार आ.यशवंत माने यांच्या प्रचाराच्या पूर्वनियोजनासाठीच्या लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आ. यशवंत माने आणि अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत अनगर ता. मोहोळ येथील युवक कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आ.यशवंत माने बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आता केवळ मी आमदार होऊन चालणार नाही पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत बाळराजे यांचा समावेश होण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असा मला विश्वास वाटतो.यापूर्वी एकदा संधी मिळाल्यानंतरची उमेदवारी नाकारल्यानंतर काही आमदारांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड केले. मात्र मी तसा नाही मतदारसंघ खुला झाल्यानंतर अजिंक्यराणा यांना संधी देऊन त्यांना विजयी करण्यासाठी मीच प्रचार प्रमुख असेल. ज्या कुटुंबाने मला दोनदा संधी दिली त्या कुटुंबात दोन आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी बोलताना मेळाव्याचे संयोजक लोकनेते शुगरचे चेअरमन येत्या विधानसभेचे स्टार प्रचारक बाळराजे पाटील म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष सहकार्यातून आणि राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राष्ट्रवादी पक्षामुळे चौफेर मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट झाला आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाफील न राहता तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाचे महत्त्व आणि आ. माने यांनी साडेचार वर्षात केलेली विकासकामे पोहोचवुन गतवेळीपेक्षा विक्रमी मताधिक्याने त्यांना विजयी करण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन केले. येत्या एक सप्टेंबर रोजी मोहोळ मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटातून दहा हजारपेक्षा जास्त मोटरसायकलद्वारे कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी बाळराजे पाटील यांनी केली.

यावेळी बोलताना अजिंक्यराणा पाटील यांनी बाळराजे पाटील यांनी यापूर्वी काढलेल्या रॅलीचे आवर्जून कौतुक करत त्यावेळी सदर रॅलीने केलेला राज्यातील सर्वात मोठा रॅलीचा विक्रम आता या 2024 च्या महारॅलीने बाळराजे पाटील स्वतःच मोडतील. गेली अनेक दशके पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या उमेदवारास प्रामाणिकपणे आम्ही निवडून देत आलो आहोत. यादेखील निवडणुकीत राजन मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेला नक्कीच मताधिक्याचा शब्द पूर्ण करू. मात्र पक्षाकडून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पक्षश्रेष्ठींनी बाळराजे यांना आमदारकीची संधी द्यावी. ती न मिळाल्यास येत्या निवडणुकीत मला देखील वेगळा विचार करावा लागेल असा इशारा हसतमुखाने त्यांनी दिला.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार यशवंत माने होते तर सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, सभापती धनाजी गावडे भारत सुतकर युवक तालुकाध्यक्ष राहुल मोरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, मुस्ताक शेख, दत्तात्रय खवळे, प्रशांत बचुटे, रामदास चवरे, नागेश साठे उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages