छत्रपती शिवाजी प्रशालेचा जिल्ह्यात नावलौकिक : सपाटे
विविध उपक्रमाने प्रशालेचा 62 वा वर्धापन दिन साजरा
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-शहरातील छत्रपती शिवाजी प्रशालेचा नावलौकिक अवघ्या जिल्हाभरात आहे. या 62 वर्षात प्रशालेचा गुणात्मक आणि संख्यात्मक विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. बहुजन समाजातील गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचे काम या प्रशालेने केले आहे, असे प्रतिपादन मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केले.
सरस्वती चौक येथील छत्रपती शिवाजी प्रशालेचा 62 वा वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर संस्थेचे उपाध्यक्ष विनायक पाटील, जनरल सेक्रेटरी महेश माने,सेक्रेटरी नामदेव थोरात, शिवदास चटके, ज्ञानेश्वर सपाटे, अशोक चव्हाण, सूर्यकांत इंगळे, प्राचार्य डॉ. मधुकर पवार आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी महापौर मनोहर सपाटे पुढे म्हणाले, मी संस्थेचा अध्यक्ष होण्यापूर्वी शाळा रसातळाला गेली होती. अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर मात्र प्रशालेचा गुणात्मक आणि संख्यात्मक विस्तार मोठ्या संख्येने झाला. प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात आले. बहुजन समाजातील विद्यार्थी या शाळेत घडले. उच्च पदावर पोहोचले आहेत.
दरम्यान, प्रशालेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रशालेतील कर्मचारी ज्ञानेश्वर सुरवसे यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांसमवेत केक कापून हा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला.
मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांनी प्रास्ताविक केले आणि आतापर्यंत झालेल्या प्रशालेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती घंटेनवरू यांनी केले तर आभार शिक्षिका अश्विनी भोसले यांनी मानले. यावेळी जयश्री साठे, श्रीपत जगदाळे, प्रियांका पवार , निलेश गळवे, मनीषा बावकर , दत्ता भोसले आदींसह शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment