Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र धर्म वाढवावा!'

 महाराष्ट्र धर्म वाढवावा!' 

      महाराष्ट्र हा नररत्नाची खाण आहे. कर्मयोग्यांची कर्मभूमी आहे. साधू संतांची पुण्यभूमी आहे. येथे कृषी प्रवण आणि धर्माधिष्ठित अशी संस्कृती उदयास आली.

      उधोतन   सूरीने मराठी माणसाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे-

' सुदृढ सावळे सहनशील अन कलहप्रिय अभिमानी!

दिले घेतले बोलत लडती मरहट्टे मैदानी  !'

   महाराष्ट्राचे भौगोलिक वैविध्य महाराष्ट्राचा संवेदन स्वभाव घडवण्यास कारणीभूत ठरले आहे. म्हणून मराठी माणसाचा स्वभावधर्म प्रा. वसंत बापट मांडताना लिहितात-.".........महाराष्ट्रीयन माणसाचे स्वभाव धर्म कोणी घडविलेच असेल,तर ते आधी भूगोलाने आणि नंतर इतिहासाने  घडवलेला आहे. मराठा लढतो तो वैऱ्याचे उसने फेडण्यासाठी, स्वाभिमानाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी,अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, जीवनमूल्यांच्या  जपणूकीसाठी, एरवी शांत मनाने आपली शेती भाती करत रहावे हाच त्याचा स्वभाव धर्म आहे."

     महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास समजून घेतल्यास हा स्वभाव धर्म स्थानात येतो. महाराष्ट्र या नावाचा उल्लेख सातवाहनांच्या  काळापासून सुरू झाला.  इ.स.  पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्र हे नाव प्रचलित झाले. महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले महाराष्ट्रीयन घराणे म्हणून इतिहासकार पैठणच्या सातवाहन राजाचा गौरव करतात. सातवाहन घराण्यातील पहिला सातकर्णी हा अत्यंत पराक्रमी राजा होता. सातवाहनाच्या काळात संगीत, साहित्य,वास्तू कलांचा, महाराष्ट्रात विकास झाला. सातवाहनानंतर महाराष्ट्रावर राज्य करणारे 'त्रिकुटक' हे दुसरे घराणे होते. त्रिकुटक घराण्यामध्ये प्रदत्त,दहरसेन, व्याघ्रसेन हे  पराक्रमी राजे होऊन गेले. इ.स. तिसरे शतक ते पाचव्या  शतकाच्या काळात वाकाटक घराण्याची सत्ता महाराष्ट्रात होती. सातवाहनाच्या काळात सुरू झालेली कला, वाङमय आणि व्यापारातील भरभराट वाकाटकाच्या राजवटीत चालू राहिली.इ.स. सन आठव्या ते दहाव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने महाराष्ट्रात आपली सत्ता प्रस्थापित केली. वेरूळ येथील कैलास लेणी राष्ट्रकूटाच्या काळात पूर्ण झाली. इ.स. नववे ते तेराव्या शतकात शिलाहार घराण्यांनी महाराष्ट्र राज्य केले. महाराष्ट्र आणि कोकणात सापडलेल्या अनेक शिलालेखावरून शिलाहार घराण्याची माहिती मिळते.  शिलाहारांच्या पाडावा नंतर संपूर्ण महाराष्ट्रात यादवांची सत्ता प्रस्थापित झाली. त्यांची राजधानी सध्याचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होते. पाचव्या किल्लम  राजाने ती दौलताबाद (देवगिरी) येथे आणली. याच काळात हेमाडपंथी मंदिरे  बांधली गेली आहेत. पुढे देवगिरीवर खिलजी घराण्याचे साम्राज्य प्रस्थापित झाले. तुघलक व बहामनी  राजवटीने काही काळ महाराष्ट्रावर राज्य केले. आदिलशाही निजामशाही आणि मोगलांच्या बाजूने अनेक मराठे सरदार आपापसात लढले; पण त्यांनी शौर्याची आणि पराक्रमाची एक परंपरा निर्माण केली.

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह झिजवीती ऊपकारे |’ महाराष्ट्र ही संतांची पवित्र, पावन भूमी आहे. या भूमीत जन्म घेतलेल्या समाजाला संतांपासून संस्कारक्षम, शाश्वत मूल्यांचा खजिना मिळाला. त्यामुळे मराठी मनाचा कणा ताठ झाला. 

ज्ञानदेव ,नामदेव यांच्या काळात महाराष्ट्रात संत गोरोबा काका , सावता महाराज , चोखोबाराय , नरहरी महाराज , जनाबाई , मुक्ताबाई , निवृत्तीनाथ , सोपानकाका , सोयराबाई , विसोबा खेचर , परिसा भागवत इ . संत मंडळी होऊन गेली.

पुढे संत एकनाथ महाराजांनी संप्रदायाला भागवत ग्रंथ रुपी खांब दिला .संत तुकोबा या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले .ही परंपरा शब्दबद्ध करत असताना असे म्हटले जाते.....

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

       या संतांनी महाराष्ट्राची भूमी वैचारिक आध्यात्मिक आणि नैतिक दृष्टीने सुपीक बनवली. पुढे याच सुपीक भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही आणि मोगल सम्राट यांच्याशी दीर्घकाळ लष्करी संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. कार्यक्षम प्रशासन यंत्रणा उभी केली. धार्मिक उदारमतवाद, चोख न्यायव्यवस्था, व्यापार वाढ आणि शौर्य वृत्तीला प्रोत्साहन देणारा असा हा राजा न भूतो न भविष्यती  पुन्हा होणे नाही....

      पुढे पेशवाईच्या काळात मराठी सत्तेचा उत्कर्ष घडून आला.१७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले.१८१८ साधी पेशवाईचा अस्त झाला आणि भारत देशासह महाराष्ट्र इंग्रजांच्या पारतंत्र्यात गेला.

     आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीवर स्वातंत्र्य विषयक चळवळीचा व प्रबोधन चळवळीचा फार मोठा प्रभाव पडला आहे. स्वातंत्र्य चळवळीत उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके ,चाफेकर बंधू यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. पुढील काळात लो.टिळक यांनी जहाल विचारांनी तर ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी मवाळ विचारांनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर यांनी, 'मारता मारता मरेतो झुंजेन' अशी बाल वयातच शपथ घेतली; व त्याच खडतर वाटेवर ते  चालत राहीले. ब्रिटिश सरकार नाकारून स्थानिक पातळीवर लोकांनी आपले प्रतिसरकार स्थापन करून राज्य करायचे, ही कल्पना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात 'पत्री-सरकार' स्थापन करून प्रत्यक्षात आणली.'भित्र्यांच्या अहिंसेपेक्षा शूरांची हिंसा चांगली',असे उद्गार म. गांधी यांनी नाना पाटील यांच्याशी बोलताना काढले होते.

       म. फुले यांनी 'धर्मराज्य भेद मानवा नसावे ! सत्याने वार्तावे ईशासाठी !! असे म्हणत महाराष्ट्रात प्रबोधन चळवळीचा पाया घातला. समाज, धर्म ,संस्कृती ,राजकारण या जीवन क्षेत्रांची  बुद्धीवादी चिकित्सा गोपाळ गणेश आगरकर यांनी केली. लोकहितवादी, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीत आपले बहुमूल्य योगदान दिले. महाराष्ट्रात समतावादी विचार कृतीत आणण्याचे काम राजर्षी  शाहू महाराज यांनी केले. समता,स्वातंत्र्य,बंधुता व सामाजिक न्याय ही तत्वे रुजवण्यात व वाढवण्यात सतत संघर्षरत राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारत देशाच्या जडणघडणीत आपले योगदान दिले.

       १मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०५ हुतात्म्यानी आपले बलिदान दिले. सेनापती बापट, एस. एम. जोशी, प्र .के .अत्रे, श्रीपाद डांगे , प्रबोधनाकार ठाकरे या  नेते गणांनी

 ही चळवळ आपल्या तळहातावर घेतली होती. त्यांच्याबरोबरच कसलीही अपेक्षा न करता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रिकुटांनी  ही  चळवळ लोकगीतांच्या माध्यमातून धगधगत  ठेवली होती.

       महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या अशा ज्ञात-अज्ञात  मराठी जणांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. 'मराठा तितुका मेळावावा ! महाराष्ट्र धर्म वाढवावा!' ही त्यांची शिकवण अंगीकारण्याचा हा दिवस आहे.




-किशोर जाधव,सोलापूर 

मो.नं.९९२२८८२५४१

Reactions

Post a Comment

0 Comments