मतदान कर्मचाऱ्यांना सलाम!
लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण सारे जण सार्वत्रिक निवडणुकांकडे पाहत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे काम शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी चोखपणे करत असतात. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करणारे बुथ पातळीवर काम करणारे शिक्षक, शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी ते
जिल्हाधिकाऱ्यापर्यंतचे सर्व अधिकारी सारेच कौतुकास पात्र ठरतात. निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर दोन ते तीन टप्प्यात प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. प्रत्यक्ष ईव्हीएम हाताळण्याचे आणि इतर माहितीचे संकलन करण्याचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर हे सर्वजण निवडणूक आयोगाचे तात्पुरते कर्मचारी होतात. प्रत्यक्ष निवडणुकीच्या आदल्या दिवशी मिळेल त्या गाव, वाड्या, वस्त्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते बुथची उभारणी करतात. गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व इतर कर्मचारी त्यांना सहकार्य करतात. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारे, एकमेकास यापूर्वी कधीही न भेटलेले हे कर्मचारी संघभावनेने काम करतात. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी तीन ते चार वाजता उठून आपल्या कामाला सुरुवात करतात. मतदान प्रतिनिधी समोर त्यांना 'मॉक पोल' घ्यावा लागतो . शाळेमध्ये हसत-खेळत, मुलांमध्ये आनंददायी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना तर प्रथमत:च प्रचंड दबावाखाली काम करण्याचा अनुभव मिळतो. पक्षीय राजकारणातून एकमेकांसमोर उभारलेल्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमुळे त्यांची काही काळासाठी घुसमट होते. पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला जातो. बोगस मतदान होण्याची, टांगती तलवार डोक्यावर घेऊन दिवसभर डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीला शांत डोक्याने सामोरे जावे लागते. यावेळी तर काही ठिकाणी ईव्हीएम कुऱ्हाडीने फोडण्याचा व जाळण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी सुद्धा कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विचलित न होता पुढील मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. अशाप्रकारे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करून लोकशाही मधील आपली महत्वपूर्ण भूमिका ग्राउंड लेव्हल वर शिक्षक वर्ग अनेक वर्षापासून निभावत आहेत. प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणारा शिक्षक आज निवडणूक आयोगाच्या विश्वासास पात्र झाला आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडून, सर्व साहित्य केंद्रावर जमा केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्या वरील समाधान पाहण्यासारखे असते. देशाची लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी आपण देखील एक खारीचा वाटा उचलल्याची भावना त्याला मनोमनी सुखावत असते. त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो. पुढील वेळेस याच उर्जेने काम करण्याची शपथ घेऊन तो घरी पोहोचतो. या सर्व निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना व शिक्षकांना सलाम तर बनतोच!
- किशोर जाधव, सोलापूर
मो .नं .९९२२८८२५४१

0 Comments