Hot Posts

6/recent/ticker-posts

देशाला नीलेश लंकेंची गरज, त्यांना दिल्लीला पाठवा !

 देशाला नीलेश लंकेंची गरज, त्यांना दिल्लीला पाठवा ! 

खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन

भातकुडगांव येथे प्रचार सभा 


भातकुडगांव (कटूसत्य वृत्त):-  एक सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना विधीमंडळात पाठविले. आता त्यांना दिल्लीला पाठवायचे असून देशाला नीलेश लंके यांची गरज असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

        महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे  बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते.   

     यावेळी राजेंद्र वळवी, वसंतराव चव्हाण, राजेंद्र आघाव, प्रताप ढाकणे, सुभाष लांडे, योगिता राजळे, ॠषीकेश ढाकणे, दत्तात्रेय फुंदे, शिवशंकर राजळे, समिर काझी, अशोक रोडे, वजीर पठाण, बाळासाहेब धोंडे, रामभाऊ साळवे, रामदास गोल्हार, राजेंद्र दौंड, बंडू रासने, सुभाष केकाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

     यावेळी बोलताना सप्रिया सुळे म्हणाल्या, मत मागताना आपण कुणासाठी मते मागतोय हा देखील प्रश्‍न असतो. मला अभिमान वाटतोय की नीलेश लंके यांच्यासाठी मते मागण्याची संधी मला मिळाली. ही संधी दिल्याबद्दल मी इंडिया आघाडीला धन्यवाद देते. या सगळया निवडणुकीत आम्ही जी मेहनत घेतोय, कदाचित त्यापेक्षा जास्त मेहनत काँग्रेस आणि शिवसेना घेतेय हे मी गेल्या महिनाभरापासून अनुभवते असे सुळे म्हणाल्या.नीलेश लंके यांचा विजय निश्चित आहे.त्यांनी दिल्लीची बॅग भरून तिकीट लगेच बुक करावे असे मला वाटतंय असा विश्‍वास सुळे यांनी व्यक्त केला. 

     सुळे पुढे म्हणाल्या, अनेक आरोप, प्रत्यारोप झाले. आमच्याबद्दलही बोलतात. मी त्याची फार काळजी करत नाही. कारण आमचं मन साफ आहे. आम्ही कोणतीही गोष्ट कुणाचा अपमान करण्यासाठी करत नाही किंवा आणि आम्ही इतिहासातही रमत नाही.आरोप माझ्यावरही होतात. सन २००४,२०१८,२०२०मध्ये झाले. २००४ मध्ये झालेल्या गोष्टीला वीस वर्षे झाली. त्याचे उत्तर आज मिळाले तर कांद्याला भाव मिळणार आहे का, कापसाला भाव मिळणार आहे का ? देशातला भ्रष्टाचार कमी होणार आहे का ? महागाई कमी होणार आहे  असे प्रश्‍न सुळे यांनी उपस्थित केले.   

लंके यांचा विजय निश्‍चित 

नीलेश लंके यांची उमेदवारी निश्‍चित झाली त्याच दिवशी महाविकास आघाडीचा विजय झाला असे मी समजतो. ते सुप्रियाताई यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करतील असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

      प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे .खते अथवा शेतीची औजारे खरेदी करताना शेतकऱ्याला जीएसटी भरावा लागतो. काल परवा खतांच्या किमती वाढविण्यात आल्या. मोबाईल रिचार्जही वाढले. पायातल्या चप्पललाही जीएसटी द्यावा लागतो. भारतात गरीबांसाठी काही मोफत राहिलेले नाही. करामुळे सर्वांना प्रचंड त्रास होत आहे. सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

आमचा पक्ष स्वच्छ झाला, मोदींचे आभार ! 

नरेंद्र मोदी यांनी आमच्या पक्षावर भोपाळमध्ये टीका केली. पक्षावर टीका केल्याने आम्ही उत्तर देण्याची तयारी करीत होतो. मात्र चारच दिवसांत आमचे नउ जण शपथ घेउन मोकळे झाले. ४०, ४२ आमदारही गेले. परंतू मोदी यांनी अशी घोषणा केली नसती तर आमचा पक्ष स्वच्छ झाला नसता. त्यांचे आभार मानले पाहिजेत असे सांगत पक्ष सोडून गेलेले नेते व आमदारांवर जयंत पाटील यांनी तोफ डागली.

यंदा दिवाळी अगोदरच दिवाळी दिसतेय !

आम्ही बऱ्याच गोष्टी ऐकतोय, आम्ही १०० कोटी खर्च करणार आहोत, १५० कोटी खर्च करणार आहोत. यंदा दिवाळीच्या जगोदरच दिवाळी दिसते आहे. बारामतीमधील सुप्रियाताईंचे अनुभव तुम्ही ऐकले. सर्व मुद्दे संपले, सगळं पायदळी तुडवलं, जनता साथ देण्यासाठी पुर्णपणे नकार देते त्यावेळी माणसाचा खिशाकडे हात जातो. प्रामणिकता, निष्ठा, तत्वाने चालणारी माणसं एकीकडे तर दुसरीकडे पैशांशिवाय दुसरे काहीच न दिसणारी सत्तेच्या शिवाय जगू न शकणारी एका बाजूला माणसं आहेत तरही विजय मात्र नीलेश लंके यांचाच असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला.  

नीलेश लंके यांना सगळे घाबरलेत !

नीलेश लंकेंसारख्या एका छोटया, साध्या, शेतकरी कुटूंबातल्या माणसाला पाडण्यासाठी इतकी माणसं दिल्लीवरून यावी लागली याच्यातच नीलेश लंकेंचा विजय आहे. नीलेश लंके यांना सगळे घाबरलेले आहेत. तुमच्या गोड हस्यामध्ये त्यांचा पराभव त्यांना दिसतोय. त्यांनी कितीही पैसा ओतला तरी नगर दक्षिणची जनता त्यांचा स्वाभिमान विकणार नाही. कुणाच्याही पराभवाखाली येणार नाही. जनतेचा माणूस दिल्लीला पाठविल्याशिवाय राहणार नाही असे जयंत पाटील म्हणाले.  

Reactions

Post a Comment

0 Comments