Ads

Ads Area

मोहितेपाटील धाडस करून उचलणार वेढा अन सोडवणार माढ्याचा तिढा

 मोहितेपाटील धाडस करून उचलणार वेढा अन सोडवणार माढ्याचा तिढा

माढा(कटूसत्यवृत्त):-महायुतीतील इच्छुक अजून स्वघरीच असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा माढ्याचा उमेदवार जाहीर करण्याचा गुढीपाडव्याचा मुहूर्तही हुकणार आहे. स्वपक्षातून बाहेर पडण्याचे धाडस संबंधित दाखवत नाहीत तोपर्यंत शरद पवार गटाचाही उमेदवार ठरणार नाही. त्यामुळे माढ्याचा तिढा वाढतोय की काय? अशी शंका व्यक्त होत आहे.

माढ्यात भाजपने उमेदवार जाहीर करून १५ दिवस लोटले आहेत. पक्षाने पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी गावभेटी, मेळावे सुरू केले आहेत. पण त्यांना महायुतीमधील आणि राजकारणातील मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर या दोन मातब्बर घराण्याचा विरोध आहे. यासाठी दोन्ही घराण्यातील प्रमुखांच्या अनेक भेटीही झाल्या आहेत. त्यातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाऊन उमेदवारी घेण्याचा पर्याय पुढे आला आहे. पण त्याची अंमलबजावणी झालेलीच नाही.

मात्र,भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हाती तुतारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शरद पवार यांच्याबरोबर धैर्यशील यांची भेटही झाली. मात्र, धैर्यशील हे अजून भाजपमध्येच आहेत. त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे धाडस दाखविले तरच ते पवार गटाचे उमेदवार असू शकतात. रामराजे आणि मोहिते-पाटील यांच्या आतापर्यंतच्या बैठकीत राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याबाबत पहिल्या क्रमांकावर धैर्यशील यांचे, तर दुसऱ्या क्रमांकावर रामराजेंचे बंधू संजीवराजे यांचे नाव आहे. धैर्यशील तुतारी हाती घेणार नसतील तर संजीवराजे नाईक-निंबाळकर उमेदवारीचे आव्हान पेलणार का? हाही प्रश्न आहे. यासाठी रामराजेंचा होकार महत्त्वाचा आहे.

भाजपचे चिन्ह अन् शुभेच्छा !

मोहिते-पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. तर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नुकत्याच भाजप कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. धैर्यशील मोहिते यांच्या सोशल मीडिया हॅँडल्सवर भाजपचे चिन्ह आणि संदेश कायम दिसून येत आहे. त्यामुळे मोहिते-पाटील काय निर्णय घेणार, हे अजूनही स्पष्ट नाही.

अनिकेत देशमुखही तयारीत ?

सांगोला तालुक्यातील व माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख हेही माढ्यातून लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यामुळे माढ्यात शरद पवार हे कोणती खेळी खेळणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close