Hot Posts

6/recent/ticker-posts

रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे टेंभुर्णी मध्ये शक्तीप्रदर्शन

 रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे टेंभुर्णी मध्ये शक्तीप्रदर्शन

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा एकदिलाने, मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे, असं आमचं ठरलंय, अशा शब्दांत माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगून निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

माढ्यातून भाजपचे तिकिट न मिळाल्याने मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. त्यातूनच अकलूजच्या (Akluj) शिवरत्न बंगल्यावर काल जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर मोहिते पाटील यांची समजूत काढायला आलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर मोहिते पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे माढ्याच्या तिकिटावरून भाजपमध्येच जोरदार धुमश्चक्री दिसून येत आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढ्यातून सर्वाधिक मतांनी निडून येतील. कारण, महायुतीमधील सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत. मोहिते पाटील यांनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे तेही निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहतील, असे आमदार संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.

मोहिते पाटील अकलूजमध्ये शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आज खासदार निंबाळकर यांनी आमदार संजय शिंदे यांच्या टेंभुर्णीतील फार्म हाऊसवर महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, शहाजी पाटील, जयकुमार गोरे, दीपक साळुंखे, कल्याणराव काळे यांच्यासह प्रमख नेतेमंडळी उपस्थित होते. त्यानंतर आमदार बबनराव शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला.

दरम्यान, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनीही आपण भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे स्पष्ट केले. मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असं सांगून निंबाळकर यांच्यासाठी सक्रियपणे प्रचार करणार असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले.

Reactions

Post a Comment

0 Comments