पोखरापूर येथील श्री जगदंबा मंदिर बांधकामाच्या साडेतीन कोटीच्या
प्रस्तावास सुधारीत प्रशासकीय मान्यता.; पुरातत्व विभागाची माहिती.
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):-पोखरापूर ता. मोहोळ येथील प्राचीन जगदंबा मंदिर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या संपादित क्षेत्रात येत असल्याने मागील ५ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी पुरातत्व विभागाचे नियंत्रणाखाली श्री जगदंबा माताचे मंदिर उतरविण्यात आले होते. मा. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार श्री जगदंबा माता मंदीर बांधकामाच्या साडेतीन कोटी रुपयांच्या सुधारीत प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे विभागीय सहायक संचालक डॉ विलास वहाणे यांनी दिली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मोहोळ ते पंढरपूर या पालखी महामार्गाचे बांधकाम सध्या सुरु आहे. सदर मंदिर या महामार्गाच्या मधोमध असल्यामुळे गावकऱ्यांनी तसेच मंदिर विश्वस्त मंडळाने हे मंदिर पाडण्यास विरोध केला होता, तसेच याबाबत श्री.जगदंबा देवस्थान विश्वस्तांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना सदरचे मंदिर उर्वरित बाजूच्या जागेत राज्य पुरातत्व विभागाकडून बांधकाम करुन त्यासाठी येणारा खर्च भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावा असे आदेश दिले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मदतीने पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मंदिर उतरवून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रस्तावित पुनर्रोपनाचे काम तातडीने करावयाचे आहे या प्रस्तावित कामाच्या रु.३,४९,६८,०९५/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास दि.१३.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार संचालक, पुरातत्व विभाग यांच्याकडून निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार या प्रस्तावास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. गतवर्षी ५ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी श्री जगदंबा माता मंदीर उतरविण्यात आले होते.योगायोगाने आज ५ मार्च २०२४ रोजी म्हणजे एक वर्षानी मंदिर बांधकामास शासनाने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे.
आगामी नवरात्र महोत्सवापू्र्वी श्री. जगदंबा माता मंदीर बाधकाम पुर्ण करण्याची मागणी मंदिर विश्वस्तांनी व ग्रामस्थांनी पुरातत्व विभागाकडे केली आहे.

0 Comments