साक्षी च्या नेत्र दीपक कामगिरीमुळे सोलापूरचा झेंडा अटकेपार...!
वर्ल्ड चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेत पटकावले कास्यपदक....!!
सोलापूर( कटू सत्य वृत्त ):-कॅलगेरी कॅनडा येथे दिनांक 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेमध्ये सोलापूरच्या साक्षी तोरणगी हिने चमकदार आणि नेत्रदीपक कामगिरी करत कास्यपदक पटकाविले.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातून सोलापूरच्या या कन्याची निवड झाली आणि तिने भारताचे प्रतिनिधित्व केल्यामुळे सर्वांचीच मान उंचावली आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी सुद्धा ती भारताचे प्रतिनिधित्व ग्रीस येथे करणार असल्याची माहिती राजेश्री थाळंगे यांनी श्रमिक पत्रकार संघामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे म्हणाले की, " साक्षी ही स्वर्गीय सुरेशजी जाधव यांचे विद्यार्थिनी असून ती वयाच्या आठव्या वर्षापासून कराटे खेळत आहे. आज पर्यंत तिने सात वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय खेचून आणलेला आहे. या नॅशनल विनर मुळे सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रामध्ये निश्चितच वैभववाची भर पडलेली आहे.
सध्या साक्षीने स्वतःची अकॅडमी प्रियांका चौक स्टेट बँक कॉलनी येथे उभा केली असून पुढील वर्षी सुद्धा ती भारताचे प्रतिनिधित्व ग्रीस या ठिकाणी करणार आहे. तिच्या यशाबद्दल तिचे आई-वडील आणि मित्रमंडळींनी तिला पुढील कार्यासाठी फार मोठ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या यशाचं गमक सांगताना साक्षी म्हणाली, मला लहानपणापासूनच कराटे स्पर्धेची फार मोठी आवड निर्माण झाली. आणि जिद्द व चिकाटीच्या बळावर मी आज वर्ल्ड चॅम्पियन बनू शकले याचा मला अभिमानातून इथून पुढेही अशाच प्रकारचं यश खेचून आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून माझी सोलापुरात राहणाऱ्या लहानशा खेळाडूची महाराष्ट्र राज्यातून निवड झाली याचा मला सार्थ अभिमान असून कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन्स स्पर्धेमध्ये जवळपास 4000 स्पर्धक होते आणि 70 देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
आपल्या भारतातून बारा खेळाडू निवडले होते त्यामध्ये राज्यातून सोलापूरचा म्हणजे माझा नंबर लागला हे मी भाग्य समजते. त्याचबरोबर सलग पाच वेळा मी नॅशनल गोल्ड मेडलिस्ट पटकावले आहे आणि इथून पुढेही अशाच प्रकारची कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहणार असून मला आई-वडिलांचं त्याचबरोबर शिक्षकांचे मोलाच सहकार्य लाभत असल्याचं साक्षीने शेवटी बोलताना सांगितलं.
या स्पर्धेत विजय संपादन करण्यासाठी पाठीवर शाबासकीची थाप आणि अनमोल सहकार्य आमदार विजयकुमार देशमुख , आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले. मिळालेल्या संधीचे साक्षीने सुवर्णसंधी रूपांतर केल्यामुळे साक्षीचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
भविष्यात तिला फुल नाही परंतु फुलाची पाकळी म्हणून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन सोलापूरकरांनी साक्षीला दिलं आहे. या पत्रकार परिषदेस सुरेश तोरणगी, शोभा तोरणगी, राजेश्री थाळंगे, आणि शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे उपस्थित होते.
0 Comments