ऑनलाईन ऐवजी आता मोबाईलची थेट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल* सोलापूरच्या ग्राहकांच्या खरेदी मानसिकतेत बदल * स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्याला देताहेत प्राधान्य
सोलापूर (कटुसत्य वृत्त): - कोविडनंतरच्या काळात मोबाईल विक्रीच्या क्षेत्रात मेनलाईन (थेट काउंटर खरेदी) मोबाईल खरेदीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. कोविड काळात ऑनलाइन व्यवहारांची चलती मोठ्या प्रमाणात होती. लॉकडाऊनमुळे ग्राहकांना दुकानावर जाता येत नव्हते. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोबाईल क्षेत्रात मेनलाईन खरेदी म्हणजे दुकानावरच्या खरेदीचा आकडा वाढला आहे. ऑनलाइनच्या मोबाईल खरेदीच्या ऑफर्स कोणत्याही असल्या तरी त्याच किमतीत दुकानावर देखील मोबाईल उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन (आमरा) ने ऑनलाइन ऑफर्स रिटेल दुकानावर देखील उपलब्ध व्हाव्यात यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आता बहुतांश मोबाईल व खरेदी योजना ऑनलाइनप्रमाणे दुकानात मिळू लागले आहेत. ऑनलाइन खरेदीत मोबाईल आवडला नाही तर सात दिवसात परत घेतले जात आहेत. पण काही ग्राहकांना नव्या मोबाईल ऐवजी इतरांनी सात दिवसात परत केलेले किंवा डिटेक्टिव्ह उत्पादने मिळू लागल्याची उदाहरणे घडू लागल्याने दुकानावरील खरेदीला प्राधान्य आपोआपच वाढले आहे. या शिवाय विक्रीपश्चात सेवा देखील दुकानाशी जोडलेली असल्याने ग्राहकांना त्याचा लाभ घेता येतो. ही सेवा ऑनलाइन खरेदीत नसल्याने ग्राहकांचा ओढा वाढतो आहे. पूर्वी ऑफलाइन विक्री हा शब्द ऑनलाइनच्या तुलनेत वापरला जात होता. मात्र मोबाईल विक्रेता संघटनेने मोबाईल विक्रीत थेट ग्राहकांना सेवेसह दुरुस्ती, मोबाईल निवडीचे स्वातंत्र्य, प्रत्यक्ष हाताळणी या विक्री साखळीतील सर्व बाबी दुकानावर मिळत असल्याने मेनलाईन (मुख्य) खरेदी हा विशेष शब्दरचना निश्चित करत त्याचा वापर सुरु केला.

0 Comments